
नवी दिल्ली : माऊंट मकालूसाठी (8,485 मी.) भारतीय सेनादलाच्या पहिल्या मोहिमेला आज लष्करी प्रशिक्षण महासंचालकांनी हिरवा झेंडा दाखवला. 8 हजार मीटर उंचीवरील सर्व आव्हानात्मक शिखरे सर करण्याचे उद्दिष्ट भारतीय लष्कराने ठेवले असून, त्याची सुरुवात माऊंट मकालूपासून होत आहे.
माऊंट मकालू सर्वाधिक धोकादायक शिखरांपैकी एक असून, वादळी हवामान आणि गोठवणारे तापमान, यामुळे ते सर करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. या मोहिमेसाठी पथकाला 6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या दरम्यान माऊंट कामेटवरची मोहीम पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली. पथकाला माऊंट भानोती इथे हिवाळी प्रशिक्षण देण्यात आले. पथक नवी दिल्लीतून मोहीम सुरु करणार असून, शिखरावर पोहोचेपर्यंत मार्गात 6 शिबिरे उभारण्यात येतील.
















