
रत्नागिरी, 4 मे : इतके दिवस सेफ झोन असलेल्या दापोली तालुक्यात आज पहिलाच पॉझिटीव्ह महिला रुग्ण सापडला. त्यामुळे दापोलीत एकच खळबळ उडाली असून या 65 वर्षीय महिलेला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. तालुक्यातील माटवण येथील ही महिला मुंबई येथे मुलाकडे रहात होती. तिचे पोटाचे ऑपरेशन सायन रुग्णालयात झाले होते. त्यानंतर या महिलेने मला बरे वाटत नाही मला गावाला घेऊन चल असे मुलाला सांगितले, त्यामुळे ती महिला तिचा मुलगा व सून रुग्णवाहिका करून 30 एप्रिल रोजी माटवण येथे आली, तेथे सरपंच यांनी त्यांना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले, ही महिला व तिच्या मुलाला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयातील अलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तिचा swab चा नमुना तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला होता, आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात पुढील उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या महिलेच्या संपर्कात कोण कोण आले त्याची माहिती घेतली जात आहे.