डोंबिवली : पूर्वेकडील मानपाडा रस्त्यावरील कपड्याला लागणारे साहित्य पुरवणाऱ्या शारदा प्रोसेस या एमआयडीसीतील कंपनीच्या गोदामाला मध्यरात्री साडेतीन वाजता आग लागून सर्व सामान जळून खाक झाले. गुरुवारी पहाटेच्या सुमारास चार मजली इमारतीला अचानक आग लागली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आगीचे नक्की कारण समजू शकले नसले तरी आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज आहे.
मानपाडा रस्त्यावर सांगाव येथील औद्योगिक विभागाच्या फेज दोन मध्ये शारदा कंपनीचे चार मजली गोदाम आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. तातडीने अग्निशमन दलाला बोलावण्यात आल्यावर कल्याण डोंबिवली महापालिकेचे 7, उल्हासनगर, भिवंडीचे प्रत्येकी एक-एक बंब घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली. गोदामात तयार झालेले कापड व यासाठी लागणारा कच्चा माल ठेवलेला होता तो सर्व जळून खाक झाला. मात्र या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठी झाली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी चार तासांचा अवधी लागल्याची माहिती केडीएमसीच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी सुरेश शिंदे यांनी दिली. मानपाडा पोलीसांनी अपघात म्हणून नोंद केली असून अधिक चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.