(लेखक: श्री मिलिंद गोवर्धन, व्यवस्थपकीय सांचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, लीफ फिनटेक)
२०२० वर्ष सुरू झाले तोपर्यंत वित्तीय क्षेत्र स्थिर आणि दमदार होते. त्यानंतर प्राणघातक विषाणूविरोधात मानवतेने दिलेल्या लढ्यात एकमेकांपासून विलगीकरण हा मुद्दा महत्त्वाचा होता. याची परिणती म्हणून अनेक क्षेत्रांपुढे कर्मचाऱ्यांच्या अनुपलब्धतेची समस्या उभी राहिली. देशाच्या जीडीपीने स्वातंत्र्यापासूनची सर्वांत वाईट कामगिरी दर्शवली. २०२०-२१ मधील जीडीपी फक्त ७.३ टक्के होता. यामुळे २०२१ मध्ये वित्तीय क्षेत्रातील कमकुवत दुवे सांधण्यासाठी बजेट्सची पुनर्रचना करणे सुरू झाले.
आर्थिक वाढ कोविडपूर्व स्तरावर परत आणण्यासाठी सरकारने अविश्रांतपणे काम केले आहे. लॉकडाउनमुळे आलेल्या निर्बंधांचा फटका सहन करत मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करण्यात आलेल्या अनेकविध उपायांना यश आल्यासारखे दिसत आहे. अधिकृत आकडेवारीतून असे दिसते की, २२ पैकी १९ उच्च-वारंवारता निदर्शकांनी (एचएफआय) सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत कोविडपूर्व स्तर गाठला. हे निदर्शक २०१९ मधील या महिन्यांमध्ये ज्या स्तरावर होते तेथे पुन्हा पोहोचले. लसीकरणाच्या मोहिमेने वेग धरला, सणासुदीचा काळ समृद्धीचा राहिला आणि ग्राहक व उद्योगांमधील भीतीची भावना कमी झाली. त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेलाही पुन्हा आपला सूर सापडू लागला आहे. दमदार अर्थसंकल्पना या पुनरुज्जीवनाला हातभार लावला.
लक्ष्यवेधी अर्थसंकल्प: २०२१ मधील अचूक लक्ष्यवेध:
अर्थसंकल्पाचा मोठा भाग संरचना उद्योगाने व्यापलेला आहे. सरकार विकासाच्या या स्तरावर मोठा भर देत आहे हे आकड्यांमधून स्पष्ट होते. या उद्योगावरील खर्चात ३५ टक्के वाढ झाली आहे आणि तो ५.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या क्षेत्रामध्ये अनेक उपक्षेत्रांचा मोठा समूह आहे. त्यात ऊर्जा, रस्ते, बंदरे, रेल्वे, दूरसंचार आदींसह अनेक उपक्षेत्रे येतात. या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे उद्योगांमध्ये अधिकाधिक रोजगारांची घुसळण सातत्याने सुरू राहील याची निश्चिती होते.
बँकिंग क्षेत्राला केलेला वायदा पूर्ण करण्यासाठी तसेच या क्षेत्रावरील भार कमी करण्यासाठी, अर्थसंकल्पात असेट पुनर्रचना व असेच व्यवस्थापन कंपन्यांच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. या कंपन्या नॉन-परफॉर्मिंग असेट्स आणि बुडीत कर्जांची समस्या हाताळण्यात मदत करणार आहेत.
अर्थसंकल्प- २०२१ मधील काही ठळक मुद्दे:
- ७५ वर्षांहून अधिक वयाच्या निवृत्तीवेतन धारकांना प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यातून सवलत देण्यात आली.
- लदाखमध्ये उच्चशिक्षणाची सोय करण्यासाठी लेह मध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
- देशात विमाने भाडेतत्त्वावर देण्यास प्रोत्साहन पुरवण्याच्या दृष्टीने इन्सेंटिव्ह्ज जाहीर करण्यात आली.
- सरकारच्या सर्वोत्तम सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या उज्ज्वला योजनेचा विस्तार केला जाणार आहे आणि परिणामी या योजनेच्या लाभार्थींच्या यादीत १ कोटींनी वाढ होणार आहे.
- प्रमुख मासेमारी बंदरांपैकी ५ बंदरांचे रूपांतर आर्थिक हालचालींचे केंद्र म्हणून केले जाणार आहे, यातील संघटित व रचनाबद्ध व्यवसायामुळे सर्व संबंधितांचा लाभ होणार आहे.
अर्थसंकल्पातील आकड्यांचे विच्छेदन:
- वित्तीय तुटीचा दर ९.५ टक्क्यांवर राखण्यात आला आणि यापुढेही आर्थिक वर्ष २२ मध्ये तो ६.८ टक्क्यांवर आणला जाणे अपेक्षित आहे.
- असेट व्यवस्थापन कंपन्या स्थापन करून बँकांच्या डोक्यावरील दायित्वाचा भार कमी करण्यासोबतच, सरकारने २०,००० कोटी रुपयांच्या पुनर्भांडवलीकरणाची घोषणा केली. यामुळे बँकिंग क्षेत्रातील बुडीत कर्जांच्या निराकरणास मदत होईल आणि बँकांचे आरोग्य सुधारेल.
- एलआयसीचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओ आर्थिक वर्ष २२ मध्ये आणला जाईल, त्यामुळे अनेक खासगी गुंतवणूकदारांना संपदासंचयाची संधी मिळेल.
- आरोग्यावरील खर्च २,२३,८४६ कोटी रुपयांनी वाढवण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ १३७ टक्के आहे.
राष्ट्राच्या अनेक वर्षांपासूनच्या वित्तीय तुटीच्या व निर्गुंतवणुकीच्या आकड्यांवर कोविड साथीचा परिणाम क्षुल्लक होता. अर्थमंत्र्यांनी २०२१ ते २०२२ या वर्षासाठी ६.८ टक्के वित्तीय तुटीचे लक्ष्य जाहीर केले आहे. ही तूट एकदा फुगून जीडीपीच्या ९.५ टक्के झाली होती. ती ३.५ टक्क्यांच्या श्रेणीत राहणे अपेक्षित आहे. २०२५-२६ सालापर्यंत वित्तीय तूट ४.५ टक्क्यांवर आणण्याचा वायदा श्रीमती निर्मला सीतारामन यांनी केला आहे. करभरणा वाढवून तसेच मालमत्तांच्या रोखीकरणातून, स्टेम करांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करून हे लक्ष्य पूर्ण केले जाईल.
एक नवीन बदल म्हणून श्रीमती सीतारामन यांनी लाल पेटीतून ‘मेड इन इंडिया’ टॅब्लेट आणला होता हे डिजिटायझेशनमधील अंत:प्रवेशाचे प्रतीक होते. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या डिजिटल इंडिया मिशनलाही यातून हातभार लागला. पारंपरिक ‘चोपड्यांची’ जागा या डिजिटल टॅब्लेटने घेतली.
रिअल इस्टेट बाजारपेठ ठरली खऱ्या अर्थाने हितकर्ती :
अर्थसंकल्प जाहीर झाला तेव्हा रिअल इस्टेट उद्योग हा बाजारातील सर्वांत फायदा प्राप्त करणारा उद्योग ठरला. परवडण्याजोग्या घरांच्या बाजारपेठेत खूप मोठी संभाव्यता आहे आणि परवडण्याजोग्या घरांच्या विभागाला करसवलत देऊन सरकारही सहाय्य करत आहे. २०१९ मध्ये व्याजाची वजावट १.५ लाख रुपयांपर्यंत नेऊन बजेट हाउसिंगला पाठिंबा देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलीच होती. परवडण्याजोगे घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या गृहकर्जासाठी ही तरतूदही मार्च २०२२ पर्यंत लागू करण्यात आली. घर घेण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांसाठी आपले स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. विशिष्ट फिनटेक कंपन्या बाजारपेठेतील विविध ग्राहकांना सेवा देत आहे. विशेषत: अनौपचारिक उत्पन्न असलेल्यांना हा कंपन्या कर्जे देतआहेत. परवडण्याजोग्या घरांची देशभरातील खरेदी वेगवान करण्यात या कंपन्या, सहज उपलब्ध होण्याजोगी तसेच किफायतशीर कर्जे देऊन, हातभार लावत आहेत.
आर्थिक वर्ष २०२१ मधील हुकलेल्या संधी:
या वर्षांत अनेक लाभ झालेले असले तरी काही क्षेत्रांकडे अर्थसंकल्पाने दुर्लक्ष केले:
- वैद्यकीय विम्याचा गोंधळ: वैद्यकीय विम्याचे हप्ते ग्राहकांसाठी स्वस्त केले जावेत अशी जोरदार मागणी होती पण यावरील जीएसटी होता तसाच ठेवला गेला. अर्थसंकल्पनाने आरोग्यसेवा व स्वास्थ्याच्या महत्त्वावर दिलेला भर बघता, जीएसटी दरात कपात करून तो १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणला गेला असता, तर याचा फायदा विमा उद्योगाला झाला असता.
- रोखतेची खिडकी अजून लोंबकळतीच: मालमत्तेचे किमान आकारमान १०० कोटी रुपये असलेल्या एनबीएफसींसाठी काही सुधारणा जाहीर झाल्या असल्या, तरी एनबीएफसींसाठीच्या लिक्विडिटी विंडो सुविधेबाबत थेट काहीच करण्यात आलेले नाही. या मुद्दयाकडे अधिक लक्ष पुरवणे आवश्यक होते.
- परदेशी बँकांना अद्याप दुय्यम स्थानच: भारतातील परदेशी बँकांच्या शाखा कराचे दर कमी करून घेण्यासाठी सक्रियपणे उपाययोजना करत आहेत. सध्या या बँकांना लावला जाणारा ४० टक्के दर कमी करून तो देशांतर्गत बँकांना लावल्या जाणाऱ्या दराच्या स्तरावर आणला गेला असता, तर त्यामुळे लक्षणीय फरक झाला असता. भारतात काम करणाऱ्या परदेशी बँकांची मोठी संख्या बघता, बँकिंग प्रणालीवर या निर्णयचा मोठा परिणाम झाला असता.
- रिअल इस्टेटच्या खऱ्या अपेक्षा: रिअल इस्टेट क्षेत्राला ‘उद्योगा’चा दर्जा मिळाला असता, तर या क्षेत्रामध्ये इक्विटी गुंतवणुका आकर्षित करून घेण्यास मदत झाली असती आणि रिअल इस्टेट विकासकांना त्यांच्या कर्जांची पुनर्रचना करून घेणे तसेच कमी व्याजाने कर्जे मिळवणे सोपे झाले असते. ही दीर्घकाळापासूनची मागणी आहे पण केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ मध्ये तिचा विचार झाला नाही. त्यानंतर रिअल इस्टेट विकासकांनी बांधकामाच्या टप्प्यातील स्टील व सिमेंटसारख्या कच्च्या मालावर भरावा लागणारा जीएसटी भाड्यावर आकारल्या जाणाऱ्या तसेच मालमत्ता पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या नफ्यावरील जीएसटीमधून वजा केला जावा अशी मागणी केली होती. हा दुहेरी करभरणा आहे, असे विकासकांचे मत आहे आणि या मुद्दयाचे निराकरण व्हावे अशी त्यांची अपेक्षा होती.














