मुंबई : महात्मा ज्योतीबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) जवळील मनीष मार्केट, साबुसिद्दीक मार्ग, मुसाफिर खाना मार्गावरील सुमारे ७६ अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेने परिमंडळ १ चे उप आयुक्त सुहास करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी कारवाई केली.
याकारवाई ३४ अनधिकृत स्टॉल्ससह ४२ अनधिकृत शेड्स तोडण्यात आल्या. तर ७६ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ४ ट्रक भरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यात आले, अशी माहिती ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. या कारवाईमुळे या परिसरातील रस्ते व पदपथ मोकळे झाले आहेत. ही कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस दलाची मदत घेण्यात आली. यापुढेही अचानक पद्धतीने धडक कारवाई नियमितपणे केली जाईल, असे दिघावकर यांनी सांगितले.