रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यावर वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचे प्राण वाचविण्याचे मोलाचे कार्य रत्नदूर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी केल्याने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सर्व सदस्यांना गौरविण्यात आले.
रत्नदूर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी सांगितले, मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह अचानक वाढला. वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक प्रवाहात अडकले. सदरची परिस्थिती लक्षात घेवून प्रवाहात अडकलेल्या पर्यटकांना दोरखंडाच्या सहायाने बाहेर काढण्यात आले.
भाट्ये समुद्रकिनारी व्हॅली क्रॉसिंग तसेच लाईट हाऊस ते भगवती किल्ला येथे झिप लाईन प्रोजेक्ट यासारखे उपक्रम राबविल्यास पर्यटन वाढीसाठी फायदेशीर ठरतील अशी अपेक्षा रत्नदूर्ग माऊंटेनिअर्सचे प्रतिनिधी जितेंद्र शिंदे यांनी व्यक्त केली. रत्नदूर्ग माऊंटेनिअर्सचे कार्य कौतुकास्पद असून जिल्हा प्रशासनाकडून अशा प्रकारचे धाडसी उपक्रम राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रत्नदूर्ग माऊंटेनिअर्सचे जितेंद्र शिंदे, अक्षय चौगुले, गणेश चौगुले, हर्ष जैन, प्रांजल चोप्रा, सूरज बावने आदी सदस्य उपस्थित होते.