डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 27 गाव परीक्षेत्रामधील विविध 50 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा बुधवारी सायंकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोनारपाड्यातील दुर्वांकुर हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने इतर पक्षांतून मनसेत इनकमिंग सुरू झाल्याचे सदर कार्यक्रमात दिसून आले.
उपस्थित सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनसेच्या डोंबिवली परीवारातर्फे कौतुक करण्यासाठी प्रदेश नेते राजू पाटील यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, जनहित पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल गणफुले, जिल्हा सचिव प्रकाश माने, जिल्हा संघटक राहुल कामत, जिल्हाध्यक्षा दीपिका पेडणेकर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे, शहराध्यक्ष मनोज घरत, शहराध्यक्षा मंदा पाटील, माजी नगरसेवक तथा उपजिल्हाध्यक्ष सुदेश चुडनाईक, उपजिल्हा सचिव नीलेश भोसले, जिल्हा सचिव सायली पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सोमनाथ पाटील, प्रभाग क्रमांक 122 चे नगरसेवक प्रभाकर जाधव, आदी मंडळी याप्रसंगी उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांनी शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातल्या विविध भागातून आलेल्या शेकडो तरूणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. तसेच डोंबिवली पश्चिमेतून देखील हेमंत दाभोळकर, सिद्धटेक साळवी, प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने तरूणांनी मनसेत प्रवेश केला. पक्षात जाहीर प्रवेश करणाऱ्या तरूणांनी राज ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करून दुर्वांकुर सभागृहाचा परीसर दुमदुमून टाकला. या सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या पदाधिकारी व मनसैनिकांना जिल्हा सचिव प्रकाश माने, जिल्हा संघटक राहुल कामत, प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम आणि प्रदेशाचे नेते राजू पाटील यांनी मार्गदर्शन केले. या संपूर्ण नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन शिबिराचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी केले.