मुंबई – “फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन” या “अवयवदान आणि देहदान” या संकल्पनेच्या प्रसारासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षपदी वसई (जि. पालघर) येथील उद्योजक श्री. पुरुषोत्तम पवार, तर सचीवपदी पुणे येथील चार्टर्ड अकाउंटंट श्री. श्रीकांत कुळकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शनिवार दि. १३ नोव्हेंबर, २०२१ रोजी मुंबईत मावळते अध्यक्ष सुप्रसिध्द समाजसेवक श्री. एच. के. सावला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षम्हणून सर्वश्री विनोद हरीया (मुलुंड), सुधीर बागाईतकर (नवी मुंबई) व सुनिल देशपांडे (नाशिक), खजिनदारम्हणून श्री. शैलेश देशपांडे, संयुक्त सचीवम्हणून श्री. प्रशांत पागनीस तसेच कार्यकारणी सदस्यम्हणून सर्वश्रीमती मीरा सुरेश, डॉ. कामाक्षी भाटे, वंदना वानखेडे, डॉ.शुभदा कुडतरकर, सर्वश्री अनिरूध्द कुळकर्णी, सतीश पाटणकर आणि एन.पी.अय्यर यांची निवड करण्यात आली. संस्थेचे मुख्य समन्वयकम्हणून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
अवयवदान आणि देहदान ही कृती काळाची गरज आहे, हे ओळखून या विषयात देशभर कार्यरत सर्व छोट्या-मोठ्या सेवाभावी संस्थांना एकत्र आणून एकमेकांशी संलग्न करून ही चळवळ जोमाने पुढे नेण्याच्या उद्देशाने “द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन” ही नोंदणीकृत संस्था कार्य करीत आहे. या नोंदणीकृत संस्थेची रितसर स्थापना २७ मे २०१५ रोजी झाली असून ही संस्था भारत सरकारच्या राष्ट्रीयकृत रोटो सोटो (ROTTO-SOTTO) या संस्थेची संलग्न संस्था (ॲसोशिएट एन्जिओ) म्हणूनही कार्य करीत आहे. संस्थेचे सर्व पदाधिकारी हे अवयवदान आणि देहदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. संस्थेच्या माध्यमातून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अवयवदान आणि देहदानासाठी जनजागृती केली जात आहे. त्यासाठी संस्थेतर्फे गेल्या चार वर्षात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चार पदयात्रा काढण्यात आल्या आहेत. या पदयात्रांच्या माध्यमातून तिच्या मार्गावरील सर्व गावे आणि प्रमुख शहरातील सर्वसामान्य जनतेला सभा, कार्यशाळा, पदनाट्य अशा माध्मातून अवयवदान आणि देहदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.














