रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी जिल्ह्यात अथर्व फोर यू इन्फा अँड ऍग्रो लि. या वित्तीय संस्थेने आर्थिक फसवणूक केल्याने महाराष्ट्र समविचारी मंचाच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी रस्त्यावर उतरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. तसेच पोलिसात गुन्हे दाखल करून गुंतवलेल्या रक्कमेचा व्याजासह परतावा मिळावा, अशी मागणी केली.
आर्थिक फसवणूक प्रकरणी समविचारी मंचातर्फे जिल्हाधिकारी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. समविचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश उर्फ बाबा ढोल्ये यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. युवाध्यक्ष निलेश आखाडे, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर आदी उपस्थित होते. अथर्व फोर यू इन्फा अँड ऍग्रो लि. या वित्तीय संस्थेने गुंतवणूकदारांना पोकळ आश्वासने, मध्यंतरात वायदे, खोटे करार, आणि खोटी वचने देऊन हजारों गोरगरीबांना लुटले असल्याचा आरोप बाबा ढोल्ये यांनी यावेळी केला आहे. वित्तीय संस्थेच्या विरोधात समविचारी मंचाने सोमवारपासून शांततामय व सनदशीर मार्गाने आंदोलन हाती घेतले आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कार्यालये बंद असल्याने हजारों ठेवीदार चिंतेत आहेत. कंपनी आपली आर्थिक परतावा परत करण्याची पत्रे देऊन स्वतसाठी संरक्षण घेत आहे. या वित्तीय संस्थेविरोधात कोणत्याही स्थानिक पातळीवर पोलीस स्थानकात तकारी घेतल्या जात नसल्याचे म्हणणे आहे. उलट संबधितांना दमदाटी केल्या जात असल्याचा तकारी सांगितल्या जात आहेत. त्यासाठी गुंतविलेल्या रक्कमा सह व्याज परत मिळवण्याच्या उद्देशाने समविचारी मंचाने न्याय हक्कासाठी हे आंदोलन हाती घेतले आहे. संस्थेसोबत बैठकीत देय रक्कम परतावा कालावधी लिखीत स्वरूपात घ्यावा. गुन्हे अन्वेषण विभागामार्फत संस्थेविरोधा गुन्हा दाखल करण्यात यावा. कंपनीचा शासकीय लेखापरिक्षण अहवाल जनतेसाठी जाहीर करावा. संस्था अध्यक्ष, संचालक मंडळावरही गुन्हे दाखल करावेत. संचालकांना पासपोर्ट देण्यात येऊ नयेत. संचालकांचे निवास पत्ते जाहीर करावेत. अशा अनेक मागण्या ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.