शेतक-यांना उद्वस्त कराल तर ते तुम्हाला उदवस्त केल्याशिवाय राहणार नाही
केंद्र सरकारवर शरद पवारांचा घणाघात
मुंबई, विशेष प्रतिनिधी – संसदीय पद्धत उद्वस्त करून बहुमताच्या जोरावर कृषी कायदे मंजूर कराल तर या देशातील सामान्य माणूस आणि शेतकरी त्या विरुद्ध पेटून उटेल. जर शेतक-यांना तुम्ही उदवस्त कराल तर ते तुम्हाला उदवस्त करतील असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला.
तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीने राज्यातले हजारो शेतकरी मुंबईतील आझाद मैदानावर धडकले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झाले. यावेळी ते बोलत होते. उन्हा तान्हाची पर्वा न करता नाशिक, धुळे, नंदूरबार आणि राज्याच्या विविध भागातून आलेले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शांततेत आंदोलन करणा-या शेतक-यांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. अशीच शेतकरी आणि कामगारांची ताकद संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दिसली होती. त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मात्र आताची ही लढाई सोपी नाही. ज्या शेतकरी, कामगारांनी ज्यांच्या हातात सत्ता दिली. त्यांना शेतक-यांच्याबाबत कवडीचीही आस्था नाही. मागील ६० दिवस उन्ह, वारा, बोच-या थंडीत जो शेतकरी रस्त्यावर बसला आहे. त्या शेतक-यांची देशाच्या पंतप्रधानांनी चौकशी तरी केली आहे, का? असा सवाल करीत मोदी सरकारच्या कारभारा विषयी खंत व्यक्त केली.
पंजाबचा शेतकरी म्हणजे पाकिस्तानी आहे का असा सवाल करीत पवार म्हणाले, पंजाबने जालियनवाला बाग आणि स्वातंत्र्य चळवळीत मोठा सहभाग घेतला होता. चीन आणि पाकिस्तानच्या युद्धात देशाच्या रक्षणासाठी बलिदान देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले. सव्वाशे लोकसंख्येचा पोशिंदा असलेला बळीराजा पंजाब, हरियाणा आणि उतर प्रदेशाच्या पश्चिम भागातील आहे. कडाक्याच्या हिवाळ्यात दिल्ली सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांविषयी बोलताना पवार यांनी शेतकर्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. या शेतक-यांबाबत केंद्र सरकारने नाकर्तेपणाची भूमिका घेतली. त्याबद्दल निषेध करीत केंद्र सरकारला फटकारले.
मी कृषी मंत्री असताना शेतक-यांसोबत सविस्तर चर्चा केली होती. कायद्याची अंमलबजावणी आणि निर्मिती यात लक्ष घातले होते. मात्र आता कोणतीही चर्चा न करता संसदेच्या एका अधिवेशनात आणि एकाच दिवशी तीन कृषी कायदे मंजूर झालेच पाहिजे, असे आम्हाला सांगण्यात आले. मात्र संसदेच्या सिनेट कमिटीकडे कायद्याचे मसुदे पाठवून त्यावर सर्वपक्षीय चर्चा घडवणे आवश्यकक होते. त्यानंतर या कायद्यांना मंजुरी द्यायला हवी होती. मात्र केंद्र सरकारने स्वच्छ भूमिका घेतली नाही. कोणतीही चर्चा न करता कायदे मंजूर केले. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा अपमान आहे, अशी ठाम भूमिका पवार यांनी मांडली. जाचक कायदे करून शेतक-यांचे जीवन उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी त्याला समाज कारणातून उद्धवस्त करतील ती ताकद तुमच्यात आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी . कोळसे पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, सपाचे नेते अबु आझमी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, शेतक-यांचे नेते अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, जितेंद्र आव्हाड, मिलिंद रानडे, सुनील केदार आदी नेते उपस्थित होते.
राज्यपाल कंगनाला भेटतात, शेतक-यांना नाही – शरद पवार
महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्याला पहिल्यांदाच असे राज्यपाल भेटले आहेत. ज्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे, मात्र माझ्या शेतक-याला भेटायला वेळ नाही, असा टोला लगावत शरद पवार यांनी शेतक-यांना सामोरे जायला हवे होते. अशी बोचरी टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली. राज्यपाल गोव्याला गेले असून शेतक-यांना सामोरे जाण्या इतकी सभ्यता त्यांच्याकडे नाही. त्यांनी नैतिक जबाबदारी घ्यायला हवी होती, अशी टीकाही त्यांनी केली.
……
आता सातबाराही विकला जाईल – बाळा साहेब थोरात
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, तीन कृषी कायदे संमत करताना या कायद्यांना विरोध करताना काही खासदारांचे निलंबन करून कायदे मंजूर केले. हे कायदे मंजूर झालेले उत्पन्नाला आधारभूत किंमत राहणार नाही. सर्व बाजार समित्या रद्द होतील. साठा करून अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल. रेशन व्यवस्था बंद होईल. शेतक-यांचा सातबाराही विकला जाईल. हे सरकार भांडवलदारांचे गुलाम झाले असून भांडवलदारांचे सांगण्यावरून काम करीत आहे. कृषी कायदे मंजूर करून शेती व्यवस्थेला हात घातला असून उद्या ते राज्य घटनेला हात घालतील त्यामुळेच शेतक-यांही ही एकजूट महत्वाची असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
….
पिकाला हमीभाव मिळावा – शेकापचे नेते जयंत पाटील
शेकापचे नेते जयंत पाटील यांनीही कृषी कायद्यांना विरोध केला. हे कृषी कायदे शेतक-यांना उ्धवस्त करणारे असून त्या विरोधात राज्यासह देशातील शेतकरी आणि कामगार रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे सरकारला हे कायदे रद्द करावेच लागतील, असे मत व्यक्त करून पिकाला ऊसाप्रमाणे हमीभाव मिळावा अशी मागणी त्यांनी केला.
…..
सार्वजिनक वितरण व्यवस्था नष्ट होईल – पी. साईनाथ
दिल्लीसह संपूर्ण देशात सुरु असलेले शेतक-यांचे आंदोलन हे शांततापूर्ण आहे. माझ्या आयुष्यात असे आंदोलन मी पाहिलेले नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी. साईनाथ यांनी व्यक्त केले. दिल्ली, हरयानासह महाराष्ट्रातील शेतकरीही आता रस्त्यावर उतरला आहे. सुमारे ४० हजार शेतकरी मुंबईत धडकले आहेत. हे कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलन आता तीव्र होत आहे. सरकारने त्याची दखल घ्यावी असे मत व्यक्त करून या कृषी कायद्यांमुळे सार्वजिनक वितरण व्यवस्था नष्ट होईल आणि त्याचा फटका सर्वांनाच बसेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
….
आता मागे हटणार नाही – शेतक-यांचे नेते हनन मुल्ला
माजी खासदार व शेतक-यांचे नेते हनन मुल्ला म्हणाले की, प्रत्येकवेळी सरकारशी चर्चा होताना सरकारने हट्टीपणा केला. मात्र काही झाले तरी कृषी कायदे रद्द झाल्याशिवाय मागे हटणार नाही. या कायद्यामागे सरकारचा उद्देश वाईट असून त्याला आमचा विरोध आहे. आता हे आंदोलन देशापुरते राहिले नसून ६० ते ७० देशात या आंदोलनाचे लोण पसरले आहे. या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. शेतक-यांचे हे आंदोलन सरकार अदानी, अंबानी आणि कॉर्पोरेटच्या विरोधात आहे, असा टोला मुल्ला यांनी लगावला.
…..
शिवसेना नेत्यांची अनुपस्थिती –
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व नेते, काही मंत्री उपस्थितीत असताना शिवसेनेचा एकही मंत्री यावेळी उपस्थित नव्हता. काही शिवसैनिक भगवे झेंडे घेऊन मोर्च्याच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून आले.