मुंबई : शेतकर्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला आज दुसर्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी पहिल्या दिवशी झालेल्या संपाची झळ बाजारपेठांमध्ये जाणवली नाही. आजपासून त्याची झळ जाणवू लागली. भाज्यांचे दर तिप्पट झाले असून, कोथिंबिरीची जुडी १०० रुपयांवर पोहोचली आहे. नाशिक कोथिंबीरीचे भाव १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. घाऊक बाजारात हीच परिस्थिती कायम राहिल्यास किरकोळ बाजारात या किमती अजून वाढणार आहेत. घाऊक बाजारात कांद्याच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली आहे.
दुधी भोपळा, चवळी शेंगा, भूईमूग, बीट, ढेमसे, वालवड, वांगी, कढीपत्ता, मूळा, पुदीना, घेवार, कोहळा, रताळी, सूरळ, शिराळी, गवार या भाज्या आज बाजारात दाखल झाल्याच नाहीत.
मुंबापुरीत भाजीपाल्या सोबत दुधाचाही तुटवडा जाणवू लागला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या एक ते दोन दिवसात मुंबईत अन्नपदार्थांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. मार्केटमध्ये आज ट्रक येण्याचे प्रमाणही कमी होते.