कोकणवृत्तसेवा विश्लेषण
मुंबई : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकर्यांनी पुकारलेल्या क्रांतीक्रारी संपात तिसर्या दिवशी फुट पडतेय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांच्या काही प्रतिनिधींसोबत वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. बैठक संपल्यावर संपाला स्थगिती देण्यात आल्याची घोषणा पत्रकार परिषदेत झाली आणि महाराष्ट्रभर एकच खळबळ उडाली. वृत्तवाहिन्यांनीही फुटीचा मुद्दा लावून धरल्याने प्रकरण आणखीनच चिघळले. परंतु, शेतकर्यांच्या नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा आणि संप मागे घेण्याची घोषणा करणार्या प्रतिनिधींना शेतकरी चळवळीपासून त्वरीत दूर ठेवण्यास यश मिळवले. यामुळे शेतकर्यांमधील संभ्रम मिटण्यास मदत झाली.
आता रविवारी शेतकरी नेते आणि शेतकरी, नाशिक येथे एकत्र येणार असून आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. तसेच पाच जूनला महाराष्ट्र बंद बाबतही आम्ही ठाम राहणार असे संघटनांकडून सांगण्यात येत आहे.
मुख्यंमंत्र्यांसह चर्चा झाल्यानंतर तातडीने काही शेतकरी प्रतिनिधींनी संपाला स्थगिती देत असल्याची आततायी भूमिका घेतली. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना शरण गेले, असा आरोप करण्यात आला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर या प्रतिनिधींनी ज्या ठिकाणी शेतकरी संपाची ठिणगी पडली, त्या पूणतांबे येथे जाऊन चर्चा करणे अपेक्षीत होते. तसे न करता या प्रतिनिधींनी संपाला स्थगिती, हे सांगण्याची केलेली घाई त्यांना नडली. परिणामी या प्रतिनिधींच्या विरोधात शेतकरी वर्ग गेला आणि सरकारविरोधी वातावरण पुन्हा तयार होण्यास मदत झाली आहे.
शेतकरी संघटनांनी सुरू केलेल्या बैठका आणि ग्रामीण पातळीवर एकाकी पडलेले भाजपा नेते यामुळे सध्यातरी मुख्यमंत्र्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. आजचा दिवस जरी मुख्यमंत्र्यांच्या विजयाचा असला तरी, संप माघारीबाबत इतर नेत्यांनी केलेल्या घोषणेमुळे शेतकर्यांना लढण्यास अधिक बळ मिळाले आहे.
मुख्यमंत्री संप थोपवण्याचे प्रयत्न करत असले तरी, भाजपाच्या इतर नेत्यांची फळी त्यांच्यासोबत नाही, असे चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेले आहे. भाजपाचे आणि शेतकर्यांचे नेते असलेले पाशा पटेल यानांही सरकार घेत असलेले निर्णय आणि चर्चा याबाबत माहिती नाही, अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळातील सहकारी शिवसेना केव्हाच भाजपाच्या विरोधात गेला आहे, त्यामुळे सरकारची परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. शिवसेनेने सरकारवर केलेले आरोप आणि शेतकरी लढ्याला दिलेला पाठिंबा यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होण्यास मदत झाली आहे. तिसरीकडे सरकारचेच एक साथी राजू शेट्टी यांनीही सरकारला धारेवर धरले आहे. आपल्याच सहकारी पक्षांनी घेरल्यामुळे मुख्यमंत्री कोंडीत सापडले आहेत. असे असतानाही त्यांनी संप थोपवण्याचा आज केलेला प्रयत्न त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा आणि कसलेल्या राजकारण्याचा अनुभव महाराष्ट्राला देऊन गेला.
१जून, २ जून आणि तिसर्या दिवशीच संपाची झालेली अवस्था, त्यातून संपकरी शेतकरी नेतृत्वाने नक्कीच बोध घेतला असेल, यात नवल नाही. मरगळलेल्या विरोधी पक्षांनाही धार आली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी इतकेच नव्हे तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासारख्या अत्यंत मरगळलेल्या राजकीय पक्षालाही नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. एसएफआय या विद्यार्थी संघटनेनेही शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देऊन आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
संप यापुढे सुरू राहणार की नाही हे मात्र आता सांगता येणार नाही. अनेक घडामोडी येत्या काही दिवसात होत राहणार आहेत. ग्रामीण भागात आंदोलनाची धग जाणवू लागली आहे. आता ती किती दिवस टिकते की विझते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण याच धगीवर राज्याचे आगाची राजकारण फिरणार आहे.