मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : अनेकांच्या दैनंदिन खाद्य असलेल्या कोंबडीच्या अंड्यामध्ये खोट निघाल्याचा प्रकार भांडूपमध्ये घडला आहे. येथील गणेशनगर भागात राहणारे राजेश सावंत यांनी विकत घेतलेली अंडी नेहमीच्या अंड्यांपेक्षा वेगळी निघाल्याने अंडीप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे.
सावंत यांनी भांडूपमधील गुरुकृपा जनरल स्टोर्समधून रविवारी सकाळी सात अंडी विकत घेतली. घरी जाऊन त्यांनी त्यांच्या पत्नीकडे ही अंडी आम्लेट बनविण्यासाठी दिली. त्यांनी अंडी फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा खूप वेळ हे अंडे फ़ुटलेच नाही. अखेर जोरदार आघात केल्यावर अंडे फुटले. यावेळी त्यात प्लास्टिकसदृश्य आवरण आढळले. आतील पिवळा बलकही पातळ झाला होत. आम्लेटही नेहमीसारखे झाले नाही. त्यांनी पुन्हा दुकानंवाल्याला अंडी दाखवली. तेव्हा ही अंडी रोजच्या वापरतील नसल्याचे आणि ती पुन्हा व्यापाऱ्याला देण्यात येईल असे सावंत यांना सांगण्यात आले.
सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून अंडी दाखवली. या अंड्यांचा उग्र दर्प जाणवला नाही. त्यामुळे अंडी खावी की नाही याबाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.