मुंबई : धार्मिक भावना भडकविल्याची पोस्ट फेसबुकवर टाकल्यानंतर ट्रॉम्बे परिसरामध्ये शनिवारी रात्री तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या प्रकरणी अरविंद दुधियार या तरुणाला अटक केली. त्याला अटक केल्याची माहिती रहिवाशांना कळताच त्यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावर गर्दी केली. अरविंदला आमच्या हवाली करा, अशी मागणी या संतप्त जमावाने केली. नकार मिळताच पोलिसांनाच लक्ष्य करण्यात आले. पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली तसेच पोलिसांची एक गाडी जाळण्यात आली, दोन गाड्याही फोडून टाकण्यात आल्या. यात १५ पोलीस जखमी झाले. या प्रकारामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यस्थाच धोक्यात आली आहे.
पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी रबरी गोळ्या झाडल्या, यात जमावातील दोनजण जखमी झाले. जखमींवर गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या प्रकरणी एमआयएमचे शाहनवाज हुसेन यांच्यासह सतरा जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी रात्री या विभागातील एका युवकाने धार्मिक भावना भडकावणारे एक छायाचित्र फेसबुकवर अपलोड केले होता. याची तक्रार काही लोकांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात केली. यावरून अरविंद ला पोलिसांनी अटक केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त शहाजी उमाप तसेच अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अखेर रबर गोळ्यांचा उपयोग करून गोळीबार केला. पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे यातील आणखी आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.