रत्नागिरी, (आरकेजी): दिवाळी सुरु झाली तरी मुंबई-गोवा महामार्गातील खड्डयांचं विघ्नं काही दूर झालेलं नाही. महामार्गाची चाळण झाली आहे. गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचा सरकारकडून गाजावाजा करण्यात आला. मात्र आता दिवाळी सुरु झाली तरी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे आहे तिथेच आहेत. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, महाड, पोलादपूर ते अगदी वडखळ नाक्यापर्यत खड्ड्यांतून कसरतीचा प्रवास कोकणवासीयांना चुकलेला नाही.
महामार्ग म्हणण्यापुरता, पण इथं खड्ड्यांचा प्रवास काही संपता संपत नाही. 1 ते 4 फुटांचे खड्डे सध्या महामार्गावर पडले आहेत. याच काही फुटांच्या खड्ड्यांतून कोकणवासीयांना जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळेच या महामार्गावरून प्रवास करताना येणारा पुढचा खड्डा किती मोठा असेल याची धास्ती सध्या वाहनचालकांना वाटते. मुंबईत आठ तासात पोहचणाऱ्या चाकरमान्यांना दहा ते बारा तास लागत आहेत. तर दुसरीकडे बाईक वरुन मुंबई गोवा माहामार्गावर गाडी चालवणे म्हणजे दिव्यचं, कारण कुठे खड्डा घात करेल याचा काही नेम नाही. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे दुचाकी चालकांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत.