मुंबई, (निसार अली) : ईव्हीएमला विरोध व आरटीआय बचावासाठी जॉईंट ऍक्शन कमिटीने मालवणीत रविवारी मोर्चा काढला. आंबोजवाडीतून मोर्चा म्हाडा वसाहत होत मालवणी अग्निशमन केंद्रापर्यंत नेण्यात आला. मोर्चा काढू नये, अशी विनंती मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी केली.
पोलिसांची सूचना झुगारून मोर्चा निघाला. म्हाडा वसाहतीजवळ पोलिसांनी आंदोलकांना अचानक थांबवून ताब्यात घेतले. मात्र, काही मोर्चाकरी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या देऊन बसल्याने त्यांना पोलिसांना सोडावे लागले. नंतर अग्निशमन दल केंद्राकडून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात त्यांचे नाव व पत्ता यांची नोंद करून सोडून दिले. या मोर्चात मालवणीतील भाजप-शिवसेना वगळता सर्व पक्ष व संस्था संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी व स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.