मुंबईच्या झोपडपट्टी भागात तसेच पोलिस दलामध्ये 400,000 सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यासाठी बीएमसी आणि बेस्टबरोबर भागिदारी
मुंबई, 8 मे : एस्सारचा सीएसआर विभाग असलेल्या एस्सार फाउंडेशनने सहेज App लाँच केले असून त्याद्वारे मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. फाउंडेशनने बीएमसी (बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन) आणि बेस्ट (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) यांच्या सहकार्याने आतापर्यंत मुंबईतील झोपडपट्टी परिसर तसेच मुंबई पोलिस दलात 400,000 सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप केले आहे.
मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेसंदर्भात काम करणाऱ्या रोटोरॅक्ट क्लब, कवच अ मूव्हमेंट आणि घर बचाओ घर बनाओ आंदोलना या काही आघाडीच्या स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) मदतीने सहेज अप विकसित करण्यात आले आहे. अँड्रॉइडवर आधारित असलेल्या या Appमध्ये स्त्रियांना मासिक पाळीला सन्मानाने तोंड देण्यासाठी आवश्यक सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होते. त्याशिवाय या अपद्वारे किशोरवयीन मुलींना अनुदानित किंमतीमध्ये स्वच्छतेसाठी आवश्यक उत्पादने उपलब्ध करून देत मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्यास प्रोत्साहन दिले जाते.
सहेज Appमध्ये मासिक पाळीशी संबंधित सर्व उत्पादनांचे खास ई- स्टोअर तयार करण्यात आले असून ही उत्पादने स्त्रियांच्या नेतृत्वाखाली चालणारे लघुउद्योग व बचतगटांनी तयार केलेली आहेत. त्याशिवाय या अपमध्ये वंचित स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स दान करण्याची सुविधा आहे तसेच अंगणवाडी कार्यकर्त्यांना ग्रामीण भारतातील मुलींना मासिक पाळीदरम्यानच्या योग्य स्वच्छतेविषयी माहिती दिली जाते. या अपमध्ये मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध डॉक्टर्सचे शैक्षणिक व्हिडिओज, संवादी गेम्सद्वारे शिक्षण आणि पीरियड ट्रॅकर यांचाही समावेश आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये तयार करण्यात आलेले हे अप प्रत्येक वयोगटाच्या प्रत्येक स्त्रीच्या गरजा पूर्ण करणारे आहे.
एस्सार फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एस्सार समूहाच्या मनुष्यबळ विभागाचे अध्यक्ष कौस्तुभ सोनाळकर म्हणाले, ‘मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यास एस्सार फाउंडेशनचे प्राधान्य आहे. स्त्री आरोग्य आणि सबलीकरण क्षेत्रात क्रांती आणण्याच्या उद्देशाने आम्ही सहेज App लाँच केले आहे. यामुळे समाजाच्या सर्व थरांतील स्त्रिया निरोगी आयुष्य जगू शकतील आणि अर्थव्यवस्थेसाठी अधिक सक्रिय योगदान देऊ शकतील. सहेज हे केवळ मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेविषयी माहिती देणारे अप नाही, तर मासिक पाळीशी संबंधित संवेदनशील, तरीही ठामपणे कार्यरत झालेली चळवळ आहे. सध्या कोव्हिड- 19 मुळे तयार झालेल्या परिस्थितीत कित्येक स्त्रियांना मासिक पाळीशी संबंधित उत्पादने व सेवा उपलब्ध होत नाहीयेत. मला आशा वाटते, की स्त्रियांपर्यंत योग्य माहिती व उत्पादने पोहोचवण्यासाठी सहेज भौगोलिक आणि भाषिक सीमा पार करेल.’