रत्नागिरी (आरकेजी): प्रवासावेळी इनोव्हा गाडीचा टायर फुटून गाडी नदीत कोसळ्याची धक्कादायक घटना आज मुंबई गोवा महामार्गावर घडली असून या दुर्घटनेत तीघेजण बेपत्ता आहेत. तर गाडीही वाहून गेली आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वरजवळच्या धामणी येथे हा अपघात घडला.आज सकाळी 10 च्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान या दुर्घटनेतील चालकाला वाचविण्यात यश आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एक इनोव्हा गाडी राजापूरकडून मुंबईकडे जात होतो. हि गाडी तशी रिकामीच होती. राजापूरहून निघालेली हि गाडी लांजा येथे आली असता तिथे चार प्रवासी खेडला जाण्यासाठी या इनोव्हा गाडीमध्ये बसले. यामध्ये दोन महिला एक १२ वर्षीय मुलगा आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हि गाडी संगमेश्वरजवळ धामणी येथे आली असता या गाडीचा टायर अचानक फुटला, त्यामुळे वेगात असलेल्या या गाडीवरिल चालकाचे नियंत्रण सुटले. आणि गाडी थेट नदीत कोसळली. त्यानंतर चालकाने दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर त्याने गाडीतील मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्याला शक्य झाले नाही. त्यानंतर या चालकाने नदितील झाडाचा आधार घेत आरडाओरडा केला. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला बाहेर काढले. दरम्यान इनोव्हा गाडी पाण्यातून वाहून गेली असून यातील चौघे जण मात्र बेपत्ता आहेत. स्थानिक ग्रामस्थ तसेच पोलिस, आपत्ती व्यवस्थापन समिती त्यांचा शोध घेत आहे.