नवी दिल्ली : ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत कंपनी एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लिमिटेडने एलईडी बल्बच्या खरेदीसंदर्भातल्या आरोपांचे खंडन केले आहे. काही वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. हे आरोप चुकीचे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीने केलेल्या खुलाशात म्हटले आहे की एलईडी बल्बची खरेदी अतिशय पारदर्शक आणि व्यावसायिक पध्दतीने केली जाते. उजाला योजनेंतर्गत आतापर्यत २२ कोटी रुपयांची विक्री झाली आहे, ज्यातून ग्राहकांच्या वीजबिलात ११५०० कोटी रुपयांची बचत झाली आहे.
ही खरेदी प्रक्रिया ई–खरेदी पध्दतीने होते, असे ईईएसएल कंपनीने सांगितले. त्यासाठी निविदा काढल्या जातात, खरेदी प्रक्रियेला बोर्डाकडून मंजुरी दिली जाते, त्यासाठीचे नियम अतिशय कठोर आहेत. तसेच केवळ भारतातल्या कंपन्याना बल्बच्या खरेदीसाठी परवानगी दिली जाते. चीनसह कुठल्याही देशाच्या कंपन्यांना या खरेदी प्रकियेत भाग घेण्याची परवानगी नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.