मुंबई : एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ जण ठार तर ३९ जण जखमी झाले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका आपत्कालीन विभागाने दिली. दरम्यान, पावसामुळे पेंटाग्राफमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मोठा आवाज झाल्याने पूल कोसळत असल्याची अफवा पसरविण्यात आली, यामुळे चेंगराचेंगरी झाली असा प्राथमिक अंदाज आहे.
परळ स्थानकात प्रवाशांची नियमित गर्दी असते. त्यात फलाट आणि एल्फिन्स्टन -परळला जोडणाऱ्या पुलाची रुंदी अरुंद असल्याने येथे कोंडी होते. मुंबईत आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. यामुळे परळ आणि एलफिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी होती. यादरम्यान रेल्वेच्या पेंटाग्राफ मध्ये मोठा स्फोट होऊन शॉर्ट सर्किट झाले. याचवेळी पुल कोसळत असल्याची अफवा पसरविण्यात आली. अफवेमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. काहींनी पुलावरून उड्या ही मारल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या दुर्घटनेत ३९ जण जखमी झाले असून २२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केईएम रूग्णालयाचे आरएमओ डॉ. प्रवीण बांगर यांनी दिल्याचे पालिका आपत्कालीन विभागाने सांगितले.
दरम्यान, पूल सुरक्षित आहे. पूल पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे.














