मुंबई: मुंबईची लाईफलाईन म्हणून समजल्या जाणारी बेस्ट लवकरच विद्युत उपकरणावर धावणार आहे. डिझेलच्या वापरामुळे पर्यावरणाची होणारी हाणी रोखण्यासाठी बेस्टने ६ बस खरेदीचा निर्णय घेतला होता. त्यापैकी २ बस बेस्ट परिवहन विभागात दाखल होणार आहेत.
बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात आहे. बेस्टवर चार हजार कोटी रुपायांचे कर्ज आहे. बेस्टला सध्याच्या बसमधून उत्पन्न कमी मिळत असून खर्च अधिक होत आहे. यामुळे उपक्रमाच्या परिवहन विभागाचे आर्थिक गणित बिघडत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी बेस्टने इलेक्ट्रिक बस घ्याव्या अशी सूचना शिवसेना युवा प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी केली होती. या सूचनेनुसार बेस्टने ६ इलेक्ट्रिक बस घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला. या बसेस खरेदी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने १० कोटी रुपयांचे सहाय्य बेस्टला केले होते. एका इलेक्ट्रिक बसची किंम्मत १.६१ करोड रुपये आहे. बसमध्ये गियर बॉक्स नसून एकदा बॅटरी चार्ज केल्यावर ही बस ३०० किलोमीटरपर्यंतचे अंतर चालू शकेल. या बस चार्ज करण्याची सुविधा सध्या बॅक बे आगारात असल्याने या डेपोमधूनच बसेस चालवण्यात येणार आहेत. या बसेस मुंबईमध्येच चालवण्यात येणार आहेत. सध्या या बसची आरटीओकडे नोंदणी प्रक्रिया सुरु असून नोंदणी नंतर प्रवाशांच्या सेवेसाठी या बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसतील.