मुंबई : पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ मे रोजी मतदान; तर २६ मे रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी येथे केली.
आयोगाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते. सहारिया यांनी सांगितले की, नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची मुदत १० जून; तर मालेगाव महानगरपालिकेची मुदत १४ जून रोजी संपत आहे. भारत निवडणूक आयोगाने ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.
एकूण ६४ प्रभागातील २५२ जागांसाठी निवडणूक होत असून इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत २९ एप्रिलपासून ६ मे पर्यंत असेल. रविवारी (ता. ३० एप्रिल ) नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील; परंतु १ मे च्या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले.
निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्रे सादर करणे- २९ एप्रिल ते ६ मे
नामनिर्देशनपत्रांची छाननी- ८ मे
उमेदवारी मागे घेणे- ११ मे
निवडणूक चिन्ह वाटप- १२ मे 2017
उमेदवारांची अंतिम यादी- १२ मे 2017
मतदान- २४ मे (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)
मतमोजणी- २६ मे
महानगरपालिकानिहाय तपशील | ||||||||
महानगरपालिका | लोकसंख्या | मतदार | एकूण जागा | महिला राखीव | सर्वसाधारण | अनुसूचित जाती | अनुसूचित जमाती | नागरिकांचा मागास प्रवर्ग |
पनवेल | ५,०९,९०१ | ४,२५,४५३ | ७८ | ३९ | ४९ | ६ | २ | २१ |
भिवंडी-निजामपूर | ७,०९,६६५ | ४,७९,२५३ | ९० | ४५ | ६२ | ३ | १ | २४ |
मालेगाव | ५,९०,९९८ | ३,९१,३२० | ८४ | ४२ | ५५ | ४ | २ | २३ |
एकूण | १८,१०,५६४ | १२,९६,०२६ | २५२ | १२६ | १६६ | १३ | ५ | ६८ |