रत्नागिरी (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे भारत निवडणूक आयोगाचे भव्य चिन्ह साकारले. दरम्यान, एसव्हीपअंतर्गत मतदान करावे, असा मोलाचा संदेश देण्यात आला.
रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर विविध शाळा महाविद्यालयांमधील अडीच हजारहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षकांनी मानवी साखळी द्वारे चिन्ह बनवला. नेत्रदीपक अशा या सोहळयाच्या निमित्ताने SVEEP अंतर्गत मतदार जागृतीचा एक कार्यक्रम सादर केला. विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी व निवडणुक निर्णय अधिकारी देखील मानवी साखळीत सहभागी झाले होते. शेकडो नागरिकांनी कार्यक्रम पाहण्यासाठी स्टेडियमवर गर्दी केली होती. आयोगाच्या चिन्हाचे छायाचित्र घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. याप्रसंगी, एसव्हीप (SVEEP) कार्यक्रमाच्या प्रमुख असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, पटवर्धन हायस्कूल, शिर्के प्रशाला, फाटक प्रशाला, आय.टी.आय., सेक्रेट हार्ट कॉन्व्हेन्ट, एम.एस नाईक हायस्कूल, एम.डी. नाईक हायस्कूल, जी.जी.पी.एस, सौ. गो.दा. जांभेकर विद्यालय, ए.के. देसाई हायस्कूल, मिस्त्री हायस्कूल, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, पॉलिटेक्नीक, रत्नागिरी , डी.एन.कॉलेज, सेंटथॉमस विद्यालय आदिंचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. सेंट थॉमसच्या बँडने सुरेल धून कार्यक्रमात सादर केल्या. पथनाट्यही यावेळी सादर करण्यात आले. वंदेमातरमने या अविस्मरणीय सोहळयाची सांगता झाली.















