रत्नागिरी : राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपलं नगराध्यक्षपद राखण्यात यश मिळवलं आहे. राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅड. जमीर खलिफे यांनी १६४२ मतांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा आमदारकी भूषवित असलेले या मतदार संघाचे शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का आहे.हनिफ काझी यांनी राजपूर नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी काल निवडणूक झाली. शिवसेनेकडून अभय मेळेकर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून अॅड. जमीर खलिफे, भाजपकडून गोविंद चव्हाण रिंगणात होते. नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत सरासरी ६८ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे तिरंगी लढतीत राजापूरचा लोकनियुक्त नगराध्यक्ष कोण होणार, याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.आज सकाळी १० वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली.
यावेळी सुरुवातीपासूनच अॅड. जमीर खलिफे यांनी आघाडी घेतली होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅड.जमीर खलिफे यांनी या निवडणुकीत बाजी मारली. खलिफे यांना ३१५० मते मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार अभय मेळेकर यांना १६०८ आणि भाजपचे उमेदवार गोविंद चव्हाण यांना ४२२ मते मिळाली.
शिवसेनेचा या पोट निवडणुकीत पराभव झाल्याने आमदार राजन साळवी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.