ठाणे : मान्सूनच्या काळात ठाणे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत विशेषत: महावितरण, रेल्वे या विभागांनी अधिक दक्षता बाळगावी तसेच येणाऱ्या तक्रारी तत्काळ सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजन भवन सभागृहात झालेल्या बैठकीत सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने सर्व पालिका, नगरपालिका, रेल्वे, महावितरण, लष्कर, विविध विभाग यांनी पावसाळ्याच्या कालावधीत केलेल्या नियोजनाचा आढावा घेणारी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात पालकमंत्री यांनी सर्व विभागांना आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत गांभीर्याने काम करण्याच्या सुचना दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार पोलीस उप अधीक्षक प्रशांत कदम, हवामान विभागाचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर आदींची यावेळी उपस्थिती होती.प्रारंभी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी सादरीकरण केले व आपत्ती व्यवस्थापन कायद्यात कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद असल्याची माहिती दिली. .पावसाळ्यात बऱ्याचदा वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात अशा वेळी महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटर्स आणि नियंत्रण कक्षातील दूरध्वनी सुरु राहिले पाहिजेत असे स्पष्ट करून पालकमंत्री म्हणाले उघड्या वायर्स, डीपी यामुळे प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत, वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच ग्रामीण भागातही वीज पुरवठा खंडित होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. ठाणे जिल्ह्यातील मध्य रेल्वेचे मार्ग पावसात दिवा, कळवा, ठाणे परिसरात पाण्याखाली जातात, सिग्नल यंत्रणा नादुरुस्त होते, असंख्य प्रवाशांना याचा त्रास होतो, हे लक्षात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांनी सतर्क राहून नाले साफ राहतील व पाणी तुंबणार नाही हे काळजीपूर्वक पाहावे.