रत्नागिरी (आरकेजी): राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या पक्षाकडे स्वतःचा उमेदवार नाही, त्यांना उमेदवार आयात करावा लागला हे दुर्दैव असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपवर केली आहे. ते रत्नागिरीत कोकण पदवीधर मतदार संघाचे शिवसेना उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचार सभेवेळी बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत, आमदार रवींद्र फाटक, जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष संतोष थेराडे उपस्थित होते.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले कि यापूर्वीचे आमदार निरंजन डावखरे यांच्याबाबत अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे, अशा अनेकांच्या भावना आहेत. अनेक समस्या त्यांनी सोडवल्याच नाहीत, त्यामुळे यावेळी या निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होईल. तसेच या निवडनूकीसाठी रत्नागिरीत नियोजनबद्ध प्रचार सुरु आहे. रत्नागिरीतून सर्वात जास्त लिड मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारजमा झालेलो नाही असं म्हणत चुकीच्या निर्णयांना विरोध सर्वात आधी शिवसेनेनं केला, सरकारमध्ये राहून देखील शिवसेना जनतेच्या हिताचे निर्णय घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड पाठींबा मिळत आहे. 6 वर्षात केवळ 3 लाख रुपये रत्नागिरीला डावखरेनी दिले. त्यामुळे यावेळी त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहन करत कोणत्याही परिस्थितीमध्ये हि निवडणूक आम्ही जिंकणारच असा विश्वास यावेळी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.