महात्मा गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तसेच काँग्रेस विचारधारेला मानणारे प्रभावी व्यक्तिमत्व आमच्यामधून निघून गेले, ही खंत काँग्रेस पक्षाला नेहमीच राहील – भाई जगताप
Mumbai : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार स्व. एकनाथ गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरिता मुंबई काँग्रेसतर्फे आज श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या श्रद्धांजली सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व सुरेश शेट्टी, मुंबई युवक काँग्रेसचे गणेश यादव, मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव, जिल्हाध्यक्ष हुकुमराज मेहता उपेक्षित होते. तसेच या शोकसभेला झूम मिटिंग द्वारे महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा AICC सचिव आशिष दुआ, ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सचिव सोनल पटेल, मुंबई व महाराष्ट्र काँग्रेसचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वानी एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली.
अतिशय मनमिळावू व्यक्ती, नेहमी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या विचाराने चालणारे व त्यांच्या विचारांचे स्वतःला पाईक समजणारे असे एकनाथ गायकवाड साहेबांचे व्यक्तिमत्व होते. आपल्या कार्याची छाप त्यांनी महाराष्ट्रात नेहमीच सोडली. मी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आहे, नेता आहे, माजी मंत्री आहे हे सांगण्यापेक्षा मी काँग्रेसचा एक सैनिक आहे हे सांगायला त्यांना नेहमीच अभिमान वाटायचा. कोणतेही आंदोलन असो, रॅली असो किंवा सभा असो, सर्वांच्या आधी ते हजर असायचे. मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, हे सांगायला त्यांना नेहमीच आनंद व्हायचा आणि त्यांची हीच इच्छाशक्ती आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झालेले आहे. धारावीचा संपूर्ण विकास व्हावी ही त्यांची संकल्पना होती, स्वप्न होते. त्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. त्यांची ही इच्छा आपण सरकार पुढे मांडू व धारावीचा विकास करून स्व. एकनाथ गायकवाड साहेबांचे स्वप्न पूर्ण करू. हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल, अशा शब्दांत नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्व. एकनाथ गायकवाड साहेबाना श्रद्धांजली देताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, गायकवाड साहेबांसाठी कोणतेही काम, कोणतीही जबाबदारी मोठी किंवा छोटी नसायची. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून ते काम करायचे. जी जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली ती त्यांनी समर्थपणे निभावली व पूर्ण केली. काँग्रेस चे व आपल्या सर्वांचे नेते राहुल गांधी यांच्या विरुद्ध काही लोकांनी षडयंत्र रचले व त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला, त्यावेळेस त्यांना एकनाथ गायकवाड साहेब जामीन राहिले. जेव्हा ते कामगार मंत्री होते आणि मी कामगार नेता होतो, त्यावेळेस जेव्हा कधी वाद उत्पन्न व्हायचा त्यावेळेस ते पोलीस आयुक्तांना म्हणायचे की, पेट पर मत मार, पीठ पर मार. जनतेचे विषय, त्यांच्या समस्या ते चांगल्या पद्धतीने जाणून होते व त्यांचे निराकरण करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असायचे. त्यांच्या जवळ असलेला अनुभव त्यांचे विचार आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहिले आहेत. त्यांना मी माझ्यातर्फे व समस्त मुंबई काँग्रेसतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे प्रभावी व्यक्तिमत्व आमच्यामधून निघून गेले, ही खंत काँग्रेस पक्षाला नेहमीच राहील. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षामध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. ईश्वरचरणी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, स्व. एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली देताना म्हणाले की, एक खंबीर नेतृत्व व यशस्वी व्यक्तिमत्व अशी स्व. एकनाथ गायकवाड यांची ओळख होती. सातारा जिल्ह्यातील एका खेड्यातून ते आले होते. त्यांचे राहणे साधे, वागणे साधे, बोलणे साधे पण ते खऱ्या अर्थाने समजून आले ते त्यांच्या भाषणांमुळे. अतिशय सुंदर, अत्यंत प्रभावी असे त्यांचे भाषण असायचे. भाषणातून त्यांचा प्रभाव सर्वांवर पडायचा. २००४ साली ज्या वेळेस ते मनोहर जोशींच्या विरोधात खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले, त्यावेळेस मनोहर जोशी हे लोकसभेचे अध्यक्ष राहिलेले होते. त्यांच्या विरोधात उभे राहणे ही मोठी गोष्ट होती. पण काँग्रेस पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून ते जोशींच्या विरोधात निवडणुकीला उभे राहिले आणि ते खासदार झाले. जनमानसामध्ये त्यांचे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. आणि हे नाते इतके प्रभावी ठरले की, मनोहर जोशींचा पराभव झाला. एकनाथ गायकवाड साहेबांची नाळ सर्वसामान्य माणसांपर्यंत जोडलेली होती. त्यांच्याजवळ सहजता होती. आमदार, खासदार व मंत्री म्हणून जेव्हा त्यांनी काम केले, तेव्हा आपल्या कामाने एक राजकारणी म्हणून आपली ओळख संपूर्ण देशाला करून दिली.
स्व. एकनाथ गायकवाड यांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, स्व. एकनाथ गायकवाड साहेब आपल्यामध्ये नाहीत, ही गोष्टच मुळात न पटण्यासारखी आहे. काही लोक त्यांनी केलेल्या कार्यामुळे ओळखले जातात, यापैकी एक गायकवाड साहेब होते. त्यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ राहिलेली आहे. विधानसभेमध्ये ३ वेळा, लोकसभेमध्ये २ वेळा, राज्यमंत्री म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केलेले आहे. आरोग्य मंत्री, उच्च तंत्रशिक्षण, कामगार मंत्री अशी महत्वाची खाती त्यांनी व त्यामध्ये प्रभावी काम केलेले आहे. पण सत्तेत असतानाच नाही तर सत्तेत नसताना सुद्धा तेवढ्याच उत्साहाने काम करणारे नेते गायकवाड साहेब होते. ते कोणत्याही वादात सापडले नाहीत. सर्वांना ते एकत्र घेऊन चालायचे. त्यामुळे त्यांच्याजवळ मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. मुंबईतील गल्लीबोळांची त्यांना माहिती होती. कुठलाही एक दिवस गेला नाही. जेव्हा त्यांचा कार्यक्रम झाला नाही. सहज उपलब्ध असणारे नेते, अशी गायकवाड साहेबांची ओळख होती. प्रत्येक कार्यक्रमासाठी ते उपलब्ध असायचे.
यावेळेस मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा म्हणाले की, गायकवाड साहेबांकडून मी नेहमीच प्रेरणा घेत आलो आहे. ज्यावेळेस मी युथ काँग्रेसमध्ये आलो होतो. त्यावेळेस आमच्या प्रत्येक आंदोलनाला, प्रत्येक मोर्चाला गायकवाड साहेब हजर असायचे व आम्हा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवायचे. जेवढा उत्साह त्यांच्यामध्ये मी १९९५ ते २००६ या काळात पहिला, तेव्हाच उत्साह अजूनपर्यंत होता. ८० वर्षांच्या वयातही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. प्रत्येक कार्यक्रमाला ते सर्वांच्या अगोदर पोहचायचे. ते एकच सांगायचे की, माझ्या जाण्याने जर पक्षातील कार्यकत्यांना मनोबल मिळत असेल व काँग्रेस पक्षाला त्याचा लाभ असेल तर मला त्या ठिकाणी जरूर जायला हवे. राजकीय जीवनात राहून आयुष्यभर ते गोरगरिबांच्या अडचणी, मागासवर्गीय लोकांच्या समस्या सोडवण्याला नेहमी प्राधान्य दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांच्या विचारांना व त्यांच्या विचारधारेचे आयुष्यभर पालन करून त्यांनी जीवनगाथा संपवली. त्यांनी केलेले कार्य हे येणाऱ्या काळात सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली..
यावेळेस काँग्रेसचे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी खासदार दामू शिंगडा यांना देखील मुंबई काँग्रेसतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.