
डोंबिवली, 15 मे (प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रातून काल (गुरुवारी) एकूण 51 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. प्रथमच एव्हढ्या मोठ्या संख्येने डिस्चार्ज दिला गेल्याने पालिका वर्तुळात प्रत्यकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने कोव्हिड १९ साठी सामंजस्याचा करार केलेल्या होली क्रॉस रुग्णालयातून ५ रुग्णांना, बाज आर आर हॉस्पिटलमधून ८ रुग्णांना आणि टाटा आमंत्रा येथून २७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. काल सकाळी मिळालेल्या माहितीनुसार ११ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता. यामुळे काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णाची संख्या ५१ झाली असून आजपर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णाची ही सगळ्यात मोठी संख्या आहे. महापालिका क्षेत्रातील ३९१ रुग्णापैकी एकूण १८१ रुग्ण म्हणजेच ४६% रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये एका ३५ दिवसाच्या बाळाचा, एका 2 महिन्यांच्या बाळाचा व एका ८ वर्षाच्या लहान मुलीचा समावेश आहे.