मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वायरी किनारपट्टीवरून अरबी समुद्रात पोहोण्यासाठी उतरलेल्या आठ विद्यार्थ्यांचा आज दुपारी बुडून मृत्यू झाला. तीन विद्यार्थ्यांना वाचविण्यास यश आले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
बेळगावमधील मराठा अभियांत्रिकी महाविद्यालयातील हे विद्यार्थी होते. मृतांत पाच मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. महाविद्यालयातील एकूण ४७ जण सहलीसाठी येथे आले होते. तीसजण पोहण्य़ासाठी समुद्रात उतरले होते.
ज्यावेळी विद्यार्थी पोहण्यासाठी उतरले त्यावेळी समुद्रात भर्ती होती. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. याचवेळी तेथे असणार्या काही त्यांना वाचविण्यासाठी समुद्रात उतरले. परंतु, तो पर्यंत उशीर झाला होता. आठही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
वाचविण्यात आलेल्या तिघाजणांना अत्यवस्थ अवस्थेत पोलिसांनी किनार्यावर आणले. त्यातील दोघांना मालवण येथील रुग्णालयात तर मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.