
मुंबई : महात्मा गांधींचे विचार तरुण पिढीपर्यत नव्याने पोहोचविण्यासाठी सर्वं गांधीवादी कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत मासचे कार्याध्यक्ष दिनेश राणे यांनी व्यक्त केले व मूलभूत अधिकाऱ संघर्ष समिती (मास ) मुंबई व आसपासच्या शाळांमध्ये गांधीविचारांच्या प्रचार व प्रसाराचे कार्य करीत असल्याची माहिती उपस्थितांना दिली.
30 जानेवारी 2025 रोजी महात्मा गांधी हुतात्मा दिनाच्या निमित्ताने मूलभूत अधिकार संघर्ष समिती ( मास ) व मुंबई सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
जेष्ठ गांधीवादी विचारवंत श्री जयंत दिवाण यांनी प्रमुख वक्ते व सर्वं उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरवात मासचे सदस्य श्री गणेश शिर्के यांनी सादर केलेल्या गीताने झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व जेष्ठ समाजवादी विचारवंत श्री संजय मं. गो यांनी गांधीची कार्यशैली व आंदोलनां विषयी उपस्थितांना संबोधित केले, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात पसरविण्यात येणाऱ्या खोट्या बातम्या व त्यातून देशात निर्माण होणाऱ्या द्वेषपूर्ण वातावरणाचा आढावा घेतला. समाजात जाणीवपूर्वक वाढविण्यात येणाऱ्या धर्मांधतेचा मुकाबला करण्यासाठी लोकशाहीवादी व पुरोगामी विचारांच्या संघटनांनी एकत्रितरित्या काम करने आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. राष्ट्र सेवा दल व इतर पुरोगामी संस्था व संघटनांचे बळकटिकरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड असीम सरोदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना गांधींच्या प्रेम, सत्य व अहिंसा या तत्वाचा आढावा घेतला. देशात वाढीस लागलेली धर्मांधता व त्यामुळे समाजात निर्माण होणारे विविध प्रश्न याविषयी चिंता व्यक्त केली. द्वेष व कट्टरता याचा मुकाबला प्रेम व अहिंसा या गांधींच्या विचारानेच करता येईल असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबई सर्वोदय मंडळाचे सेक्रेटरी श्री शेख हुसैन यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता महात्मा गांधींच्या रघुपति राघव राजाराम या भजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाला मुंबई सर्वोदय मंडळ अध्यक्ष टी. के. सोमय्या,जनता दल मुंबई अध्यक्ष श्री प्रभाकर नारकर, सामाजिक कार्यकर्ते बजरंग सोनावणे, मूलभूत अधिकाऱ संघर्ष समिती ( मास ) चे संग्राम पेटकर, चित्रा राणे, डॉ सलीम खान, जनार्दन जंगले, वीरेंद्र कुमार, डॉ मिरजकर, नॉरीन, मधू मोहिते, नितीन माळी, घनश्याम अंबोकर, राजेश जाधव, युनूस शेख, रविंद्र पांचाळ, सदानंद यादव, श्रीमती शिर्के, दिपक राक्षे, ज्योती केळकर, अपर्णा दळवी, भिकाजी मलुष्टे, मन्सूर पटेल, सर्वोदय मंडळाचे शंकर बंगाडे, उषा सोनावणे, सुरज भोईर व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.















