मुंबई : मुंबई महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे ३५ शाळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सीसीटीव्ही, सॅनेटरी नॅपकीन वेंडींग मशिन, डिजीटल क्लासरुम आदी नव्या उपक्रमासाठी तरतूदी केल्या आहेत. शुक्रवारी शिक्षण विभागाचा सन २०१८ – १९ चा २ हजार ५६९.३५ कोटींचा अर्थसंकल्प पालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांना सादर केला. मागील वर्षापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात २५७.६९ कोटींनी वाढ केली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात नव्या तरतूदी विद्यार्थीसंख्या व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्ररीत करण्यासाठी भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरशिततेच्यादृष्टीने ३८१ शाळांमध्ये ४ हजार ६४ सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. शालेय मध्यान्ह आहारासोबतच प्रथिनयुक्त सुका मेवा व पौष्टीक खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. प्राथमिक विभागाकरिता २५ तर माध्यमिकसाठी २. ३८ कोटींची तरतूद केली आहे. आतंरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी २४ विभागात एकप्रमाणे २४ शाळा सुरु केल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पीआयएसए टीआयएमएसएस सारख्या आंतराष्ट्रीय परिक्षांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. उर्दू शाळांमध्ये डीएड शिक्षणांची पदे भरण्याचे प्रस्तावित आहे. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी अक्षरशिल्प उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीत व व्यक्तिमत्वात बदल होईल, असे पालिकेने अर्थसंकल्पात म्हटले आहे. विद्यार्थ्यांना फुटबॉल अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार असून यासाठी ‘फूटबॉल क्लब ऑफ इंडिया’ आणि ‘मुंबई जिल्हा असोसिएशन फूटबॉल नेक्स्ट फाऊंडेशन’च्या सहकार्याने ‘रोड टू जर्मनी’ उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत. याउपक्रमाअंतर्गत निवड होणाऱ्या गुणवान खेळाडूंना थेट जर्मनीला पाठवण्यात येईल, असे अर्थसंकल्पात नमूद आहे.
महत्वाच्या तरतूदी
१३०० शालेय वर्गात डिजिटल क्लासरूम ३७ कोटी ३८ लाख
टॅबसाठी १८ कोटी
पोषणआहाराअंतर्गत सुका मेवा २७ कोटी ३८ लाख
सुरक्षिततेसाठी ४०६४ सीसीटिव्ही कॅमेरे ५ कोटी
२४ आंतरराष्ट्रीय शाळा २५ लाख
१५९ शाळांमध्ये १७२ सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन २ कोटी ५० लाख
२५ ग्रंथालयात ई लायब्ररी १ कोटी
शालेय इमारतींची दुरुस्ती व पुनर्बांधणी २७७ कोटी ६७ लाख
विद्यार्थ्यांना बेस्ट बसने मोफत प्रवास ६५ कोटी
शाळांमध्ये केंद्रीय ध्वनिक्षेपक यंत्रणेसाठी ७४ कोटी ८३ लाख
अक्षरशिल्प प्रकल्प
पालिकेच्या ३५ शाळांचे खाजगीकरण