रत्नागिरी : सभासद येत नसतील तर आपण त्यांच्या समस्या जाणून घेण्यास त्यांच्यापर्यंत पोहोचूया. विद्यार्थ्यांना एवढेच सांगेन की तुमच्यामध्ये जिद्द, आत्मविश्वास असला पाहिजे. विविध परीक्षांच्या माध्यमातून कुठे जायचं याची दिशा असली पाहिजे. दिशा ठरवून काम केलं तर
नक्कीच यश मिळवू शकतो, असे प्रतिपादन माध्यमिक शाळा सेवक पतपेढीचे माजी अध्यक्ष रामभाऊ गराटे यांनी केले. रत्नागिरी तालुका अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाच्या वतीने गुणगौरव व सत्कार समारंभात ते बोलत होते.
फाटक हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ रवींद्र नेवरेकर, दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह शेखर लेले, जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाचे कोषाध्यक्ष संतोष शिंदे, तालुकाध्यक्ष शंकर पालवकर, कार्याध्यक्ष सौ. श्रद्धा नागवेकर, सचिव संतोष मळेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर म्हणाले की, शिक्षकेतर कर्मचारी संघटना हे एक कुटुंब आहे. सध्या कामांची संख्या वाढली आहे, परंतु लिपिक बंधू, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही. आपले चतुर्थश्रेणी कर्मचारी बीएड, पदवीधर होत आहेत. या कर्मचाऱ्यांना संस्थाअंतर्गत भरतीमध्ये स्थान मिळाले पाहिजे. 24 वर्षांची वेतनश्रेणी लागू होण्याकरिता प्रचंड पाठपुरावा महामंडळामार्फत करण्यात आला. परंतु ज्यांना याचा लाभ मिळणार आहे त्यातील काही कर्मचारी आज गैरहजर आहेत. प्रश्न सोडवण्याकरिता संघटना आवश्यक आहे. महामंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम संघटना सदस्यांसाठी सुरू आहेत. लवकरच पदभरतीचा मार्ग निश्चितपणे मोकळा होणार आहे. अनुकंपा भरतीचा प्रश्न रत्नागिरी तालुक्यातून पूर्ण सुटले आहेत. महामंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव खांडेकर, अनिल माने यांनी याकरिता खूप कष्ट केले आहेत. सभासदांनी याचा विचार करून आपले जास्तीत जास्त योगदान द्यावे.
शेखर लेले यांनी सांगितले की, संघटनेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आपण कौटुंबिक वातावरणामध्ये हा कार्यक्रम साजरा करतोय. यशस्वी विद्यार्थी, पालक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संतोष शिंदे म्हणाले की, 2009 मध्ये रत्नागिरी तालुका संघटनेने हा गुणगौरव समारंभ सुरू केला, आज 2024 मध्येही हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे. खरंच खूप आनंद होतोय की हा कौटुंबिक कार्यक्रम आहे.
संघटनेवर प्रेम करणारे आपण सगळे आहात. नीलेश दामले यांनी सूत्रसंचालन केले तर संतोष मळेकर यांनी आभार मानले.
या वेळी गुणवंत विद्यार्थी सावी शेट्ये, सुमेध मोहिते, गणेश गराटे, साईश्री मळेकर, यश सनगरे, सानिका गराटे, आर्या कांबळे, हर्षिता नवाले, महंमद मुल्ला, पौर्णिमा व्हटकर, अजिंक्य कदम, तेजस कांबळे, शिवानी पाटील, राखी शिंदे, सुमित रसाळ, नितीन शिंदे यांचा गौरव करण्यात आला. तसेच बारावी उत्तीर्ण झालेले कर्मचारी दत्ताराम घडशी आणि बीए बीएड झालेले महेश केळकर आणि सेवानिवृत्त झालेले कर्मचारी जहांगिर कोतवडेकर, तुकाराम लाखण, वसंत भारती, योगिता गवतडे, दिलीप साळुंखे यांचा सन्मान करण्यात आला. सत्कारामध्ये प्रमाणपत्र, भेटवस्तू, शाल, श्रीफळ तसेच चाफ्याचे रोप देण्यात आले.