मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात शाडूच्या गणपती मूर्तीना मागणी वाढली आहे. पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. गेल्या काही वर्षात लोकांमध्ये पर्यावरणावर जनजागृती वाढल्याने या वर्षी शाडू आणि कागदाच्या लगद्यापासून तयार होणार्या मूर्तींच्या मागणीत वाढ झाली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत पर्यावरणस्नेही गणेश मूर्तींच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. आम्हीही त्या नुसार मूर्ती बनवीत आहोत. गणेशोत्सवातून पर्यावरण रक्षणाचा संदेश जात आहे, हे महत्वाचे आहे, असे मत भांडूप येथील मूर्तिकार गणेश गावडे यांनी नोंदविले आहे.
साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सरकारने मूर्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या किमती कमी करायला हव्या आहेत, अशी मागणी देखील त्यांनी केली. आमच्या कडे आतापर्यंत ३७० शाडू मूर्तींची,१५० प्लास्टर ऑफ पॅरिस तर ७० कागदाच्या लगद्याच्या मूर्तींची मागणी झाली आहे.
आम्ही ५० वर्षांपासून या व्यवसायात आहोत. गावडे निवास, नारदास नगर, टीपी रोड, भांडुप पश्चिम, मुंबई येथे मूर्ती साकारण्याचा व्यवसाय करत आहोत, असेही गावडे म्हणाले. गावडे यांच्या कारखान्यात तयार होणार्या मूर्तींना पूर्व उपनगरात मोठी मागणी आहे. खास आकर्षक लागद्यापासून तयार केलेल्या मूर्तीही त्यांच्या कारखान्यात उपलब्ध आहेत. सार्वजनिक ते घरगुती गणपती मूर्ती त्यांच्या कारखान्यात तयार होतात. नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.