
कार्यक्रमास उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासह आमदार गणपतराव देशमुख, भाई गिरकर, आशिष देशमुख यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक, मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तावडे म्हणाले की, भारतातील पहिले पुस्तकांचे गाव भिलार येथे तयार करण्यात आले असून आगामी काळात हे गाव प्रकाशक, लेखकांसाठी पुस्तक प्रकाशनाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त करुन येणाऱ्या काळात पुस्तकांच्या गावी विविध साहित्यिकांचे महोत्सव आयोजित करुन मराठी भाषा दिन अधिक व्यापक प्रमाणात साजरा करण्याचा मानसही तावडे यांनी व्यक्त केला.
आज मराठी भाषा गौरव दिनी राज्यातील शाळा-महाविद्यालयात जवळपास एक कोटी विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव गीताचे सामूहिक गायन केल्याचेही त्यांनी सांगितले.
पहिली ते दहावी इयत्तेच्या अभ्यासक्रमात मराठी सक्तीचे करण्याच्या सूचना अभ्यासक्रम मंडळाला राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचेही मराठी भाषा मंत्री तावडे यांनी सांगितले.
चालत रहा, चालत रहा- राम नाईक
चार सर्वोच्च पुरस्कारांसह विविध वाङ्मय पुरस्कार प्रदान
त्याशिवाय विविध साहित्य प्रकारांतील ३५ राज्य वाङ्मय पुरस्कारदेखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात राहुल कोसंबी, ल.म.कडू, सुजाता देशमुख आणि श्रीकांत देशमुख या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिकांचा सन्मानही करण्यात आला.
राज्यपाल राम नाईक यांना राज्य शासनाच्या वतीने ‘लक्ष्मीबाई टिळक’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या १८ दर्जेदार पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ‘मराठीच्या पोतडीतून’ या मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारा कार्यक्रम यावेळी नामवंत कलाकारांनी सादर केला.
मराठी भाषा विभागाच्या वतीने स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६ यावेळी प्रदान करण्यात आले. काव्य, नाटक, एकांकिका, कांदबरी, लघुकथा, ललितगद्य, दलित साहित्य, शिक्षणशास्त्र, बाल वाङ्मय आदी ३५ प्रकारात विविध लेखक, साहित्यिकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.