
मुंबई, 9 जून २०२६: राष्ट्रीय कॅन्सर सर्व्हायव्हर दिनाचे औचित्य साधून, आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रणी संस्था ‘युई लाईफसायन्सेस’ने (UE LifeSciences) भारतातील कर्करोगाच्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ‘सुरुवातीच्या टप्प्यातील निदान’ आणि जागरूकतेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे.
कर्करोगाच्या उपचारात आणि सर्व्हायव्हरशिपमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील निदानाच्या याच महत्त्वावर प्रकाश टाकताना, ‘युई लाईफसायन्सेस’चे सह-संस्थापक आणि सीओओ भौमिक संघवी म्हणाले, “प्रत्येक कर्करोग विजेता हा अशा एका जीवनाचे प्रतिनिधित्व करतो ज्याला जगण्याची नवीन संधी मिळाली आहे. उपचारातील प्रगतीने कर्करोग शुश्रूषेचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले असले, तरी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, सर्वात मोठी संधी हा आजार बळावण्यापूर्वीच त्याचे निदान करण्यात दडलेली असते. कर्करोगावर मात करणे हा केवळ एक वैद्यकीय उपचार परिणाम नाही—तर ती सामाजिक जागरूकता, योग्य वेळी घेतलेला निर्णय, स्क्रीनिंगची उपलब्धता आणि आरोग्य सेवा पुरवठादार, काळजीवाहू (केअरगिव्हर्स) व समाज यांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. आपण सुरुवातीच्या टप्प्यातील निदानामध्ये जेवढी जास्त गुंतवणूक आणि प्रयत्न करू, तेवढ्याच अधिक सर्व्हायव्हर्सच्या यशोगाथा आपण घडवू शकू.”
सामान्यतः जेव्हा कर्करोगाबद्दल बोलले जाते, तेव्हा बहुतांश चर्चा ही त्याचे निदान, उपचार आणि जगण्याचा दर (सर्व्हायव्हल रेट) यावरच केंद्रित असते. परंतु, कर्करोगाच्या उपचारानंतर आयुष्य पुन्हा पूर्वपदावर आणणे, गमावलेला आत्मविश्वास पुनश्च प्राप्त करणे आणि एका नवीन सामान्य (न्यू नॉर्मल) जीवनाचा शोध घेणे, या प्रवासाविषयी देखील चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे. आज संपूर्ण भारतात हजारो कर्करोग विजेते हे या गोष्टीचे जिवंत उदाहरण आहेत कि कर्करोग म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे.
अशीच एक प्रेरक कहाणी मीरा (बदललेले नाव) यांची आहे, ज्यांच्या आयुष्याला त्यांच्या भागात आयोजित केलेल्या एका सामुदायिक तपासणी (स्क्रीनिंग) शिबिरामुळे नवीन दिशा मिळाली. मीरा यांनी त्यांच्या शरीरात कोणतीही वेदना न देणारी एक गाठ अनुभवली होती, ज्याला त्यांनी सामान्य समजले होते. परंतु, वेळेत झालेल्या स्क्रीनिंगमुळे आणि सुरुवातीच्या टप्प्यातील निदानामुळे त्यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली. भारतात सध्या स्तनांचा (ब्रेस्ट), गर्भाशय ग्रीवाचा (सर्व्हायकल) आणि तोंडाचा (ओरल) कर्करोग ही मोठी आव्हाने ठरत आहेत, जिथे योग्य वेळी केलेली चाचणी हेच सर्वात मोठे शस्त्र ठरते.
आज वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे कर्करोगानंतर पूर्वीपेक्षा जास्त रुग्ण दीर्घ आणि सुदृढ आयुष्य जगत आहेत. तथापि, तज्ज्ञांच्या मते, अशा कर्करोग विजेत्यांच्या अधिक यशोगाथा निर्माण करण्यासाठी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सामाजिक जागरूकता, योग्य वेळी कृती आणि आरोग्य सेवांची सुलभ उपलब्धता असणे अत्यंत गरजेचे आहे.
राष्ट्रीय कॅन्सर सर्व्हायव्हर दिवसानिमित्त ‘युई लाईफसायन्सेस’ सर्व नागरिकांना, विशेषतः महिलांना स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आणि नियमितपणे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप करण्याचे आवाहन करत आहे. कारण प्रत्येक विजेत्याच्या कथेत दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला वेळेत पाऊल उचलण्याची आणि आशेचा मार्ग निवडण्याची प्रेरणा देण्याची अफाट ताकद असते.















