
मुंबई, 4 मे : रेशन दुकानांवरील ई पॉस प्रणालीच्या पार्श्वभूमिवर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी जनता दल सेक्युलरने केलेली मागणी राज्य सरकारने मान्य केली, अशी माहिती जनता दल सेक्युलरचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी दिली. त्यानुसार, राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज क्षेत्र असल्याने कोरोनाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्रात मे महिन्यात रेशनद्वारे अन्न धान्याचे वाटप करतांना ई पॉसची अट शिथिल करण्यात आली असून अन्न धान्याचे योग्य वाटप होण्यासाठी स्वस्त धान्य दुकांनामध्ये शिक्षक तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ दिली आहे. धान्य घेण्याकरता येणाऱ्या शिधापत्रिकाधारक यांचा मशिनवर अंगठा न घेता त्यांचा रेशनकार्ड नंबर घेण्याची रास्त भाव दुकानदारास मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, शिधावाटप दुकानातून धान्य देताना पूर्ववत ई पाॅस मशिनचा वापर करण्याचे आदेश केंद्राच्या सांगण्यावरून राज्य सरकारने दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार संसर्गजन्य असल्यामुळे शिधावाटप दुकानातून ई पाॅस मशीनचा वापर करणे म्हणजे या रोगाच्या प्रसाराचा मार्ग मोकळा करून देण्यासारखे होणार आहे, त्यामुळे याबाबतचे आदेश त्वरित स्थगित करण्यात यावेत, अशी मागणी जनता दल (से) पक्षाने केली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवून पक्षाने ही मागणी केली होती.
ई पॉस मशीनवर लाभार्थ्यांचा अंगठा देतांना व वाटप करणाऱ्या दुकानदारांचा जवळून संपर्क येत असल्याने कोरोना साथीचा संसर्ग तसेच संक्रमण होण्याची दाट शक्यता होती.














