
मुंबई: मानवी विष्ठेमध्ये आढळणारे इ-कोलाय हे जीवाणू फेरिवाले वापरत असलेल्या बर्फांमध्ये आढळल्याने असे पदार्थ खाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सर्व २४ विभागांमधील खाद्यपदार्थ व पेयपदार्थ विकणारे फ्रूट ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचे स्टॉल्स, बर्फाचे गोळेवाले, लस्सी व ताक विक्रेते, फास्ट फूड सेंटर्स इत्यादी फेरीवाल्यांकडील बर्फ नमुने; तसेच उपहारगृहातील बर्फाच्या नमुन्यांची चाचणी केली. त्यात सरासरी ९६ टक्के बर्फ नमुने हे खाण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. याच नमुन्यांपैकी ७५ टक्के नमुन्यांमध्ये ‘इ–कोलाय‘ जीवाणू आढळून आले. फेरीवाल्यांकडील १० टक्के पाणी नमुन्यांमध्येही ‘इ–कोलाय‘ जीवाणू आढळून आले आहेत. या जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे गॅस्ट्रो (अतिसार), जुलाब, कॉलरा, कावीळ,विषमज्वर (Typhoid) यासारखे जलजन्य आजार होऊ शकतात. ही बाब लक्षात घेता खाद्यपदार्थ व पेय पदार्थ विकणा–या फेरीवाल्यांकडील पाणी पिणे, बर्फ मिश्रीत पेय पिणे; तसेच खाद्यपदार्थ खाणे नागरिकांनी टाळावे असे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे.
जलजन्य आजारांना प्रतिबंध व्हावा यासाठी खाद्यपदार्थ व पेय पदार्थ विकणा–या फेरीवाल्यांकडील बर्फ व पाणी नमुन्यांची चाचणी करण्याची मोहिम अधिक व्यापक करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. यानुसार बर्फ व पाणी नमुने यांची तपासणी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येत आहे.
१ एप्रिल ते २५ एप्रिल २०१७ या कालावधीत महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील खाद्यपदार्थ व पेयपदार्थ विक्रेत्यांकडील बर्फ व पाणी नमुन्यांची चाचणी करण्यात आली. या चाचणी दरम्यान महापालिकेच्या २४ पैकी १४ विभागातील सर्व म्हणजेच १०० टक्के बर्फ नमुने हे खाण्यास वा पिण्यास अयोग्य (Unfit) असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
त्याचबरोबर महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये सरासरी ७५ टक्के बर्फ नमुन्यांमध्ये इ–कोलाय जीवाणू आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे गोवंडी, देवनार इत्यादी परिसरांचा समावेश असणा–या‘एम पूर्व‘ या विभागात आढळून आले आहे. या विभागातील सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के बर्फ नमुन्यांमध्ये इ–कोलाय जीवाणू आढळून आले आहेत.
खाद्य व पेय पदार्थ विकणा–या फेरीवाल्यांकडील बर्फ हा ‘आईस फॅक्टरी‘ मध्ये तयार होत असल्याने त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाच्या ‘अन्न व औषध प्रशासन खात्या‘ला (FDA)कळविण्यात आले आहे, अशीही माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. केसकर यांनी दिली आहे.
खाद्य व पेय पदार्थ विकणा–या फेरीवाल्यांकडील पाणी नमून्यांमध्ये देखील `इ–कोलाय‘ बाधित नमुने मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांमध्ये सरासरी २७ टक्के पाणी नमुने हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचे; तर सरासरी १० टक्के पाणी नमुने हे इ–कोलाय बाधीत असल्याचे आढळून आले आहे.
















