डोंबिवली : शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवलीकर शिवसैनिकांकडून आदिवासी पाड्यांत नित्योपयोगी अन्नधान्यांचे ट्रकभर साहित्य नुकतेच पाठविण्यात आले. शिवसेनेचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका गुलाब म्हात्रे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. शिवसैनिकांनी गोळा केलेली दीड लाख रोख मदत देखील आदिवासी पाड्यांतील गरजूंना वाटप करण्यात येणार असल्याचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सांगून आदिवासी पाड्यात ट्रक रवाना झाले.
कल्याण-शीळ मार्गावरील घरीवली गावात नुकत्याच उभारण्यात आलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयातून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमात घारीवली आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य परीस्थिती निर्माण झाली आहे. आदिवासी आणि दुर्गम भागात भूकबळींची संख्या वाढत असतानाच सरकारी मदत त्यांच्यापर्यत पोहोचली नसली तरी शिवसेनेने मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मदत करण्याचा विडा उचलला. त्यासाठी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका गुलाब म्हात्रे या दाम्पत्याने पुढाकार घेतला.
पालघर, डहाणू आणि विक्रमगड पट्ट्यात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने अत्यंत कठीण जीवन व्यतीत करत आहेत. 3 हजार किलो तांदूळ, 300 किलो तुरडाळ, 300 किलो तेल, कपडे आणि नित्यपयोगी वस्तूंनी भरलेला ट्रक या कार्यक्रमानंतर मार्गस्त करण्यात आले. विशेष म्हणजे नगरसेवक म्हात्रे यांनी स्वतःकडील एक लाख रुपये रोख तसेच इतर दानशूर मित्रांनी जमा केलेले 50 हजार रोख असे एकूण दीड लाख रुपयांची मदत थेट आदिवासी बांधवांना त्यांच्या पाडे-वाडी-वस्त्यांत जाऊन वाटप करण्यात येणार आहे. याबाबत नगरसेवक म्हात्रे म्हणाले, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे बॅनर न लावता त्या खर्चाची मदत गोर- गरीब आदिवासी व मागास भागात जाऊन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला आम्ही शिवसैनिक समस्त डोंबिवलीकर दानशूर व्यक्तींनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.
शिवसेना पक्ष नेहमी कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे समाजातील तळागाळात रहाणाऱ्यांची सेवा करतो. समाजातील तळागाळात जाऊन काम करताना शिवसैनिकांसह दानशुरही उत्फूर्तपणे प्रतिसाद देतात ही अभिमानाची गोष्ट आहे असे म्हात्रे यांनी पुढे सांगितले.