
सज्जनांनी संघटीत व्हावे. असे आवाहन करताना मुख्यमंत्री
पुणे : समाजातील सज्जन शक्ती संघटीत झाल्यासच दुर्जन शक्तींवर सहज मात करता येते आणि सकारात्मक बदल घडतो. म्हणून सज्जन शक्तींनी संघटीत व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. येथील गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात अनुलोम लोकराज्य अभियान (अनुलोम) पुणे विभागाच्यावतीने आयोजित सारथ्य समाजाच्या विकास मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अनुलोमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे, सारंगधर निर्मल, हर्षल मोर्डे, मयुर राजे उपस्थित होते.
लोकशाहीच्या यंत्रणेला चालविण्यासाठी समाजातील लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असतो. लोकसहभागाशिवाय कोणतेही काम होवू शकत नाही. समाजातील सकारात्मक शक्ती जेव्हा सक्रीय होते, त्यावेळी समाजात वेगाने परिवर्तन घडत असते. समाजातील सुप्त सकारात्मक शक्तीला सक्रीय करण्याचे काम अनुलोम ही संस्था करत आहे. ही संस्था पूर्णपणे अराजकीय असल्याने समाजासह शासकीय यंत्रणेलाही ही संस्था जवळची वाटते. समाजात चांगल्या विचाराने समाजाच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या अनेक समाजसेवी संस्था आहेत. या सर्व संस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम अनुलोम संस्था करत आहे. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात वेगवान पद्धतीने काम करणारी ही संस्था आहे. अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत २० लाख सामान्य लोकांना जोडून ७ लाख कार्यकर्ते निर्माण करणारी ही संस्था आहे. सामाजिक कार्यकर्ते हेच अनुलोम संस्थेचे शक्तीस्थान आहे. समाजात परिवर्तन करण्याची शक्ती संघटनेत आहे. त्यामुळे देशासाठी, समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांनी संघटीत होवून काम करण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसात शासनाच्या पुढाकाराने उद्योग क्षेत्रातील सामाजिक दायित्व फंडाच्या माध्यमातून मोठे काम राज्यात उभे राहिले आहे. कोणतेही सकारात्मक काम हे राष्ट्रीय कामच आहे. त्यामुळे समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांनी एकत्रित येवून काम करण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथ, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, समाजकल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन, पीएमआरडीएचे संचालक किरण गित्ते, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे,विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोड यांना अनुलोम सन्मित्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
या मेळाव्याच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्था, संघटना, युवक मंडळे, महिला बचत गट यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यासाठी सुमारे दोन हजाराच्या वर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुलोमचे पुणे विभाग प्रमुख अनिल मोहिते यांनी केले. तर आभार रविंद्र दहाड यांनी मानले.