रत्नागिरी: बिकानेर – कोचीवली एक्स्प्रेसमधून टर्क नामक अंमली पावडर घेऊन जाणाऱ्या तरुणास रेल्वे पोलिसांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेउन शहर पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याकडून दोन मोबाईल, एक ब्ल्यू टूथ, रोख रक्कम आणि टर्क नामक अंमली पावडरच्या ७९ पुड्या असा एकूण ७ हजार १८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.जिब्रान बशीर भाटकर(२८, रा. राजीवडा शिवखोल, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गुरुवार २२ मार्च रोजी दुपारी ३.५० वा. सुमारास रेल्वे पोलिस रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर गस्त घालत असताना त्यांना प्लॅट फॉर्म क्र.१ वर लिफ्टनजीक एका तरुणाची हालचाल संशयास्पद वाटली. त्यांनी त्याची विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे रेल्वे पोलिसांनी त्याची तपासणी केली. तपासणीत त्याच्याकडे वरील मुद्देमाल मिळून आला. रेल्वे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन सायंकाळी शहर पोलिसांच्या हवाली केले. संशयित तरुणाकडे मिळालेली पावडर नक्की अंमली पदार्थ आहे की, नाही त्याची तपासणी करण्यासाठी शहर पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणी करणाऱ्या पथकाला पाचारण केले होते. सायंकाळी उशिरा ही पावडर टर्क नाम अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाल्यावर जिब्रानला अटक करण्यात आली होती.