मुंबई : मुलांनी आपल्या कामात नेहमीच सातत्य ठेवून प्रयत्नशील राहिल्यास त्याचबरोबर जिद्द आणि चिकाटी ठेवल्यास मुलं नक्कीच मॅजिग घडवू शकतात, असे प्रतिपादन डॉ. शुभांगी पारकर यांनी केले. दादर पूर्व येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात रविवारी कार्यक्रमात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
स्वातंत्र्य सैनिक व माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव यांच्या स्मृत्यर्थ मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय व परिवर्तन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ व खास पालक, पाल्यांसाठी ‘स्पर्धात्मक युगात जगायचे कसं’ याविषयावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित असलेल्या मनोरुग्ण विभाग केईएम रुग्णालय डॉ. शुभांगी पारकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या की सुंदर आयुष्य जगण्यासाठी चांगली बुद्धिमत्ता असायला हवी पण ती प्रत्येकाकडे असेलच असे नाही. मात्र या स्पर्धात्मक युगात जगताना आपण ठरविलेल्या कामात सातत्य आणि चिकाटी टिकवून ठेवल्यास यश मिळणारच. त्यामुळे स्पर्धाना न घाबरता आपली बुद्धिमत्ता व मानसिक तयारी ठेवून प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आज वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असा सल्ला देखील पालक व विदयार्थी वर्गाला त्यांनी दिला. तर आपल्या पाल्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी न करता त्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांना आवडेल आशा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असेही पारकर म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महिंद्रा अँण्ड महिंद्रा चे जनरल मॅनेजर संदिप डोरले, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय कार्यवाह हेमंत जोशी, शारदाश्रम शाळेच्या शिक्षिका वंदना मोरे, अपना बाजार कार्यध्यक्ष अनिल गंगर, परिवर्तन मुंबई संस्थापक जगदीश नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान मान्यवरांच्या हस्ते बुद्धी मापन स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा यात विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तर विजया कदम आणि सारिका साळुंखे यांनी या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी विशेष मेहनत घेतली.















