रत्नागिरी, (आरकेजी) : देवरुखमधील पहिले डॉक्टर रघुनाथ विठ्ठल कानिटकर यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने देवरुख मधील गोरगरिबांचा देवदूत हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
६० वर्षांपूर्वी एमबीबीएस होणारे ते देवरुख मधील पहिले डॉक्टर ठरले. आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात त्यांनी देवरुखमधूनच केली आणि शेवटपर्यंत ते तेथेच कार्यरत राहिले. त्याकाळी प्रवासाची साधने उपलब्ध नव्हती; म्हणून सुरुवातीपासून त्यांनी सायकलवरुन उपचारासाठी रुग्णांच्या घरी जाणे अवलंबिले. ग्रामीण भागात रात्री अपरात्री बैलगाडीने प्रवास करत दुर्गम खेड्यातील गोरगरीब रुग्णांवर त्यांनी मोफत उपचार केले.
देवरुख मधील सेवा सहकारी सोसायटी आणि तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्षपद त्यांनी उत्तमरित्या सांभाळले. या शिवाय पुरातन रघुपती देवस्थानाचे ते विश्वस्त होते. देवरुख विठ्ठल मंदिर , देवरुख शिक्षण प्रसारक संस्था, ओंकार पतसंस्था आदिंसह जवळपास सर्वच सामाजिक संस्थांचे ते सदस्य व पदाधिकारी होते.
गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते; मात्र उपचाराला ते प्रतिसाद देत नव्हते. काल संध्याकाळ पासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज दुपारी १ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेकडो नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. आज संध्याकाळी ४ वाजता त्यांच्यावर देवरुखात अंत्यसंस्कार करण्यात आले.