मुंबई, (निसार अली) : राष्ट्र सेवा दल आणि परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डाॅ. प्रकाश बेंद्रे यांचं आज सकाळी कांदिवली पश्चिमेतील धानुकरवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८६ वर्षांचे होते.
शिक्षक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. तसेच शिक्षण क्षेत्रात सुधारणा व्हावी, यासाठी विविध प्रयोग आणि लिखाणही त्यांनी केले होते. परिवर्तनाच्या प्रत्येक लढाईत ते सहभागी होत होते. धर्मांधतेविरूद्ध आणि जातीअंताच्या चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता. शिक्षण घेण्याचा ध्यास त्यांनी नेहमीच काय ठेवला. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी पीएचडी मिळवली. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता हा विषय त्यांनी संशोधनासाठी घेतला होता.
राष्ट्र सेवा दल तसेच दिवंगत समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्यासोबत ३५ वर्ष त्यांनी कार्य केले. मृत्यूपश्चात कर्मकांड न करता देहदान करावे, असा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानुसार कुटुंबियांनी सर्व सोपस्कार पूर्ण केले आहेत.
त्यांची शिकाऊ वृत्ती आणि सामाजीक कार्य करण्याचे ध्येय, यामुळे ते सदैव स्मरणात राहतील, अशी आदरांजली त्यांचे निकटवर्तीय ड़ॉ.आशीष भोसले यांनी वाहिली.