मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, अस्मितादर्श चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. केंद्र सरकारने पद्मश्री या पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता. ते ८१ वर्षांचे होते.दलित साहित्य आणि दलित चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या पानतावणे यांनी लोकसाहित्य, कविता, नाटक, समीक्षा आणि संशोधनपर लेखन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दलित साहित्य अकादमी, फाय फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. २००९ मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. डॉ. पानतावणे यांच्याकडे स्वच्छपणे समजलेला आंबेडकरी ध्येयवाद होता व साहित्य म्हणजे काय याची त्यांना तेवढीच जाणीवही होती. पानतावणे यांचे वाचनही चौफेर होते. धर्म-जाती-देश-निरपेक्ष अशा ‘साहित्यिक’ या भूमिकेवरच ते प्रेम करत आल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. केंद्र सरकारने नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.पानतावणे यांचे धम्मचर्चा, मूल्यवेध, मूकनायनक, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दुसऱ्या पिढीचे मनोगत, लेणी आदी साहित्य प्रकाशित झाले आहे .प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि साहित्याला वैचारिकतेचे अधिष्ठान देणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.विशेषतः साहित्यिकांच्या नव्या पिढीला अभिव्यक्तीसाठी माध्यम उपलब्ध करुन देण्यासह तिच्या वैचारिक जडणघडणीतही त्यांचे मोलाचे योगदान होतेव्यासंगी प्राध्यापक, कृतीशील विचारवंत आणि परखड समीक्षक म्हणून एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या डॉ. पानतावणे यांनी वंचित-उपेक्षितांच्या प्रबोधनासह सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान ‘अस्मितादर्शक‘ म्हणून समाजाला सतत मार्गदर्शन करीत राहील. अशा शब्दात मुख्यमंत्री यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली .