
डोंबिवली : मानसिक विकार हा सुद्धा असाध्य रोगाप्रमाणे जैविक आजार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. संवादाचे प्रमाण कमी झाल्याने शालेय किंवा महाविद्यालय स्तरावरील मुले स्वत:चे जीवन संपवत आहेत. अशावेळी शिक्षक पालक यांनी त्यास समजून घ्यावे ही गरज असते. समस्या काय आहे हे निदान न झाल्याने ती चिघळते आणि टोकाचे पाऊल उचलले जाते. यासाठी समस्येचे निदान वेळीच होणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन डोंबिवली येथील मानसोपचार तज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये केले.
डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने डॉ. पाध्ये यांची मानसिक आरोग्य, प्रबोधन, निदान, उपचार व पुनर्वसन या विषयावर वार्तालाप कार्यक्रम घेण्यात आला. डोंबिवली येथे त्यांच्या मानस उपचार केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या संघाच्या वार्तालाप कार्यक्रमाची प्रस्तावना नरेंद्र थोरावडे यांनी केली. आभार प्रदर्शन बापू वैद्य यांनी मांडले.
वडीलधारी मंडळी किंवा पालक पूर्वी घास भरवताना लहान मुलांना काऊ चिऊच्या गोष्टी सांगत. आता घास भरवताना लहान मुलांच्या हातात मोबाइल चिकटला आहे. घरातील पालकांनीच लहान मुलांच्या हातात मोबाइल दिला आहे, याकडे पाध्ये यांनी लक्ष वेधले.
हल्लीची जीवनशैली स्मार्ट, ध्येयवादी, आरामदायी बनत चालली आहे. तशीच ती आव्हानात्मक आहे त्यामुळे यातून मानसिक ताणतणाव निर्माण होत असून तरूणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहेत. या आत्महत्यांना प्रचारी स्वरुप प्राप्त होत आहे, असेही ते म्हणाले. मानसिक विकारांबाबत देश-परदेशात अंधश्रध्दा असली तरी माध्यमांमुळे प्रबोधन झाले आहे. देशात मानसिक उपचार करणाऱ्या डाँक्टरांची कमतरता आहे. वर्षाला अवघे ४०० ते ५०० डाँक्टर निर्माण होतात त्यांची संख्या वाढायला हवी. २०१७ च्या मानसिक आरोग्य कायद्याप्रमाणे मानसिक रुग्णांना असाध्य रुग्णांप्रमाणे आर्थिक सहाय्य प्राप्त व्हायला हवे, असे ते म्हणाले.














