
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. पी. पी. कुलकर्णी यांना इंडो-नेपाळ एकता अॅवॉर्ड पुरस्काराने 25 नोव्हेंबरला सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार नेपाळचे माजी पंतप्रधान लोकेंद्र बहादूरचंद, उपप्रधानमंत्री टोप बहादूर रायमाझी व सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश कुलदीप शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला.
नवी दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयातील दि इंडियन सोसायटी ऑफ इंडरनॅशनल लॉ सभागृहात इंडो-नेपाळ सांस्कृतिक परिषदेमध्ये प्रशस्तीपत्र, सुवर्णपदक व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. इंडो-नेपाळ सांस्कृतिक परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणार्या प्रतिभावान व्यक्तींना गौरवण्यात येते. भारत, नेपाळ या राष्ट्रातून पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून फक्त दोघांची निवड झाली. डॉ. कुलकर्णी हे गोगटे महाविद्यालयात 31 वर्षांपासून रसायनशास्त्राचे अध्यापन करत आहेत. ते मुंबई विद्यापीठाचे पी. एचडी.चे मार्गदर्शक आहेत. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग, मुंबई विद्यापीठ यांचे चार संशोधन प्रकल्प पूर्ण केले. महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल आहे. मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी शाखेचे ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समन्वयक आहेत. त्याद्वारे 12 वर्षांपासून जिल्ह्यात विज्ञान प्रसार, प्रचार करत आहेत. त्यांचे शैक्षणिक, संशोधनात्मक, विज्ञान क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्राप्त झाला. 2007 मध्ये मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून गौरवण्यात आले. त्यांना पत्रकार संघाची राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप मिळाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, रत्नागिरी शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले