डोंबिवली, (प्रशांत जोशी) : बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे झाली. तरी तपासामध्ये दिरंगाई झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंनिस व समविचारी संघटनाच्या वतीने डोंबिवलीत रविवारी निर्भय माँर्निंग वॉक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
डोंबिवली पश्चिम येथील सम्राट चौकातून रॅलीची सुरुवात झाली. या रॅलीत अंनिसच्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेखा भापकर, डोंबिवली शहर कार्याध्यक्ष श्रीपाद कुले, किरण जाधव, डॉ. शांताराम जाधव, किशोरी गरुड, गणेश शेलार, एस.एस. शिंदे, लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष व भाकपचे ठाणे जिल्हा माजी सचिव काळू कोमास्कर, चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे, अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. नितिन जोशी, विद्यार्थी भारती संघटनेचे सर्वेश लवांदे व समविचारी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते रॅलीत उपस्थित होते.
डोंबिवली शहरात पूर्व पश्चिम भागात रॅली फिरल्यानंतर इंदिरा चौकात रॅलीचा समारोप झाला. येथे विविध संघटनांनी जागरुती गीते व पथनाट्य सादर केले. त्यानंतर सुरेखा भापकर व नितिन जोशी यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले.
विचारवंताचे व पुरोगामी कार्यकर्ता यांचे खून होत आहेत. ते थांबणार कधी? आमच्या आंदोलनाची धार कमी होण्यासाठी सरकार संशयित म्हणून कुणालाही अटक करत आहे. सरकारने खऱ्या सुत्रधाराला अटक करावी अशी मागणी भापकर यांनी केली. यावेळी नितिन जोशी म्हणाले, विचारांचा लढा विचारानेच झाला पाहिजे. डॉ. दाभोलकरांनी धर्मामधील अंधश्रध्दांना विरोध केला. अशा व्यक्तीला मारण्याची ज्यांची इच्छा, अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.