मुंबई, (निसार अली) : खगोलशास्त्रात करिअरसाठी आज अनेक संधी उपलब्ध असून तरुण शास्त्रज्ञांनी त्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी नुकतेच लालबाग येथे विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत केले.
ते पुढे म्हणाले की, सूर्याच्या केंद्रस्थानी दशलक्ष डिग्री इतके प्रचंड तापमान असून, सूर्यामध्ये हायड्रोजनची उर्जा निघते. सूर्याच्या अंतर्भागात हेलीअम वायू तयार होत आहे आणि त्यातून नव्या क्रिया-प्रतिक्रिया, कार्बन, ऑक्सिजन निर्माण होत आहे. सूर्यामध्ये आंतरिक बदल व त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे आणखी 6 ते 7 अब्ज वर्ष सूर्याचे आयुष्य आहे. सूर्यामध्ये बळ असते ते गुरुत्वाकर्षणच्या विरुद्ध मदत करते.
आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा वेगळा अर्थ लावून नवीन रूप दिले. महाराष्ट्रातील नांदेड येथे आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभारण्यात आला. त्यामुळे अतिसूक्ष्म लहरींची माहिती मिळविता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी विवेकानंद व्याख्यानमालेच्या पासेसे विक्रीत सहभागी झालेले साहिल शिरसाट, ऋतुराज पाटील, सोहम कांबळे या मुलांचा तसेच हीरक महोत्सवी व्याख्यानमालेनिमित्त माजी व्याख्यानमाला प्रमुख कमलेश जगदाळे आणि विद्यमान व्याख्यानमाला प्रमुख नितीन झोडगे यांचा नारळीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात आभार प्रदर्शनाचे काम सहाय्यक व्याख्यानमाला प्रमुख अमित गुरव यांनी केले.