डोंबिवली, (प्रशांत जोशी) : येथील जननी आशिष बालसंगोपन केंद्राच्या संस्थापिका डॉ कीर्तिदा प्रधान यांचे नुकतेच वयाच्या 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक कार्याची आवड असलेल्या डॉ प्रधान अखेरच्या क्षणा पर्यत या केंद्राशी जोडलेल्या होत्या. त्याच्या जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पती स्त्रीरोगतज्ञ डॉ. अरविंद प्रधान, मुलगा स्त्रीरोगतज्ञ डॉ आशिष, मुलगी डॉ. मोनिका सुना जावई नातवंडे असा परिवार आहे.
कान नाक घसा तज्ञ डॉ. कीर्तिदा प्रधान यांनी अनेक वर्षे राजावाडी रुग्णलयात मानद रुग्णसेवा देतानाच त्यांनी पती डॉ प्रधान यांच्या समवेत डोंबिवली पश्चिमेकडे मोनिष नर्सिंग होम मधून रुग्णसेवा दिली होती. करोना नंतर मागील दोन वर्षापासून त्यांनी नर्सिंग होम बंद केले असले तरी जननी आशिषच्या माध्यमातून त्यांची समाजसेवा सुरू होती. अनाथ बालकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी जननी आशिष चा डोलारा उभा केला या संस्थेने आजवर हजारो अनाथ मुलांना हक्काचे घर मिळवून दिले आहे. यामुळेच त्यांच्या जाण्याने जननी आशिष बालसंगोपन केंद्राचा मोठा आधार हरपला आहे