मुंबई: दि. २५-२७ जून २०२४ दरम्यान कोलंबो, श्री लंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील किसळ गावच्या सरपंच कॉ. डॉ. कविता वरे यांची अभिनंदनीय निवड झाली आहे.
“महिलांच्या प्रतिनिधित्वाद्वारे सामाजिक प्रतिरोध मजबूत करणे” हा या बैठकीचा विषय आहे.
युरोपियन युनियन आणि कॅनडा सरकारने पुरस्कृत केलेल्या या बैठकीत जगातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे दीडशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
इतक्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी कॉ. कविता वरे यांची झालेली निवड ही त्या लोक प्रतिनिधी म्हणून करत असलेल्या कार्याची पावती आहे. या बैठकीस उपस्थित राहून लोकशाही राजकीय प्रक्रिया मजबूत करण्याचे विविध आयाम समजून घेण्याची संधी त्यांना प्राप्त होत आहे. कॉ. डॉ कविता वरे यांच्या या विशेष निवडीबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षास समाधान आणि अभिमान वाटत असून पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी त्यांचे हार्दिक अभिनंदन करत आहे आणि बैठकीतील भरीव सहभागासाठी शुभेच्छा देत आहे, असे डॉ. उदय नारकर राज्य सचिव यांनी सांगितले.